>> आसगाव घर मोडतोड प्रकरणात पोलिसांवरच दबाव आणल्याचा होता आरोप; आलोक कुमार नवे पोलीस महासंचालक
आसगाव येथील प्रदीप आगरवाडेकर यांच्या घराच्या मोडतोड प्रकरणानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राज्याचे पोलीस महासंचालक डॉ. जसपाल सिंग यांची काल अखेर नवी दिल्लीत बदली करण्यात आली. तसेच राज्याचे नवे पोलीस महासंचालक म्हणून आयपीएस अधिकारी आलोक कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंबंधीचा आदेश काल जारी केला. बदलीची शिफारस केल्यानंतर तब्बल 14 दिवसांनी जसपाल सिंग यांच्या बदलीचा आदेश जारी झाला.
गेल्या जून महिन्यात आसगाव येथील प्रदीप आगरवाडेकर यांचे घर पाडण्याची घटना घडली होती. या घटनेंतर मुख्यमंत्र्यांनी आगरवाडेकर यांच्या घराच्या मोडतोड प्रकरणाची चौकशीचा आदेश मुख्य सचिवांना दिला होता. प्रदीप आगरवाडेकर यांचे घर पाडण्यासाठी मदत करावी म्हणून जसपाल सिंग यांनी आपणावर दबाव आणल्याचा अहवाल हणजूण पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक प्रशल देसाई यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना सादर केल्यानंतर ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. प्रशल देसाई यांनी 28 जूनला हा अहवाल सादर केला होता. या प्रकरणात राज्याच्या पोलीस महासंचालकांनी दबाव आणल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकारने 29 जूनला केंद्रीय गृहमंत्रालयाकडे त्यांची बदलीची शिफारस केली होती. त्याआधी प्रशल देसाई व अन्य दोन पोलिसांना या प्रकरणात निलंबित केले होते.
राज्यातील विरोधी पक्षांनी जसपाल सिंग यांच्या तातडीने बदलीची मागणी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नवी दिल्लीला तातडीने भेट दिली होती. तथापि, राज्य सरकारच्या शिफारशीनंतरही सिंग यांची बदली होत नसल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात होते.
‘तो’ अहवाल ठरला सिंग यांच्या बदलीस कारण
हणजूणचे निलंबित पोलीस निरीक्षक प्रशल देसाई यांनी मुख्य सचिवांना सादर केलेल्या अहवालानंतर जसपाल सिंग हे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. सिंग यांनी आपणास पणजीत बोलावून प्रदीप आगरवाडेकर यांचे घर पाडण्याचे काम पूर्ण करू न दिल्याने खडसवायला सुरुवात केली. तसेच, माझ्याविरुद्ध उच्चस्तरीय समिती कार्यवाही करेल, अशी धमकी दिली. याशिवाय स्वत:ची गोव्यातून अन्यत्र बदली झाली, तर जेथे नियुक्ती होईल, तिथे एनडीपीएस कायद्याखाली बनावट गुन्हा दाखल करेन आणि हणजूण पोलीस निरीक्षकाच्या संगनमताने अमलीपदार्थ व्यवहार करत असल्याचा जबाब त्या आरोपीकडून नोंदवून घेऊन अमलीपदार्थ प्रकरणात अडकवण्याची महासंचालकांनी दिली, असे प्रशाल देसाई यांनी आपल्या अहवालात म्हटले होते. हाच अहवाल सिंग यांच्या बदलीस कारणीभूत ठरला.
तब्बल 416 पोलिसांच्या बदल्या
नवी दिल्लीतून पोलीस महासंचालकांच्या बदलीचा आदेश जारी झाल्यानंतर राज्याच्या पोलीस खात्यातील साहाय्यक उपनिरीक्षक ते पोलीस शिपाई पदावर काम करणाऱ्या सुमारे 416 जणांच्या बदल्या आदेश काल जारी करण्यात आला आहे.
आयपीएस अधिकाऱ्याला आरोपी बनवा : फेरेरा
राज्याच्या मुख्य सचिवांनी केलेल्या चौकशीत घर मोडतोड प्रकरणामध्ये वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आसगाव प्रकरणामध्ये आयपीएस अधिकाऱ्याला आरोपी बनवावे, अशी मागणी काँग्रेसचे हळदोण्याचे आमदार ॲड. कार्लुस फेरेरा यांनी काल केली.