जशास तसे!

0
114

भारत – पाकिस्तान सीमेवरचा तणाव वाढत चालला आहे. पाकिस्तानकडून सातत्याने होणार्‍या गोळीबाराला जशास तसे उत्तर देण्याचे आदेश भारत सरकारने दिले असल्याने येणार्‍या काळात या १९२ कि. मी. च्या सीमेवरील परिस्थिती अधिक चिघळत जाण्याची शक्यता दिसू लागली आहे. ‘गोळीस गोळीने उत्तर द्या’ असे सांगणे सोपे असते, परंतु त्यातून दोन्ही बाजूंची माणसे हकनाक मारली जात आहेत. त्यामुळे हल्ल्या – प्रतिहल्ल्याच्या या पोरखेळातून युद्धाच्या दिशेने तर आपण चाललेलो नाही ना याचा विचार दोन्ही देशांकडून खरे तर व्हायला हवा आणि प्रत्येक पाऊल जपूनच टाकायला हवे. भारत आणि पाकिस्तान ही दोन्ही अण्वस्रसज्ज राष्ट्रे आहेत आणि पाकिस्तानी नेतृत्वाचा माथेफिरूपणा पाहिला तर तो देश कोणत्याही थराला जाऊ शकतो. त्यामुळे सीमेवरील सध्याचा तणाव निवळला पाहिजे आणि त्यासाठी अर्थातच संभाव्य युद्ध झालेच तर आपले काय होईल याचे भान पाकिस्तानला आले पाहिजे. पण ती शक्यता सध्या तरी दिसत नाही. सध्या युद्धबंदीचे जे चौफेर उल्लंघन पाकिस्तानने चालवले आहे, त्यामागचे कारण आधी आपण समजून घ्यायला हवे. यंदा जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक व्हायची आहे आणि त्यासाठी हिवाळा सुरू होण्याआधी घुसखोरांना भारतीय सीमेत घुसण्याची संधी मिळवण्याचा हा डाव असू शकतो. पण त्यापेक्षाही व्यापक षड्‌यंत्र यामागे आहे, ते म्हणजे आंतरराष्ट्रीय समुदायाला मध्यस्थी करण्यास भाग पाडण्याचा आणि काश्मीरचा मुद्दा पुढे आणण्याचा हा डाव आहे. यापूर्वी नवाज शरीफांनी काश्मीर प्रश्न संयुक्त राष्ट्रांपुढे उपस्थित केलाच होता. आता पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र लष्करी निरीक्षक गटाकडे धाव घेतली आहे. सदर गट कालबाह्य झाल्याची भूमिका भारताने यापूर्वीच घेतलेली आहे ही बाब वेगळी. पाकिस्तानकडून होणारा गोळीबार हा उत्तर काश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला वगैरे भागांत नव्हे, तर दक्षिणेकडील अखनूर, जम्मू, सांबा, अरनिया, कठुआ वगैरे भागांमध्ये सुरू आहे. यापैकी बरीच गावे ही हिंदू व शीख लोकवस्तीची आहेत. त्या निरपराध नागरिकांना लक्ष्य केले जात आहे. गेला आठवडाभर जे रणकंदन चालले आहे, त्यामुळे जवळजवळ तीस हजार लोकांना अन्यत्र स्थलांतर करावे लागले आहे. गेल्या आठवड्यातच किमान ६३ वेळा युद्धबंदीचे उल्लंघन पाकिस्तानने केले. ८१ एमएमच्या तोफगोळ्यांनी तेथील घरादारांची चाळण झाली आहे. कधी कुठून सुसाट गोळी येईल आणि जीव घेईल याची शाश्‍वती उरलेली नाही. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे पाकिस्तानचा हा गोळीबार पूर्वनियोजित आहे याविषयी आता शंका उरलेली नाही, कारण गोळीबारांस सुरूवात होण्यापूर्वी पाकिस्तानी सीमावर्ती भागांतील नागरिकांना अन्यत्र हलवण्यात आले होते. म्हणजे हा हल्ला पूर्वनियोजित आहे. नोव्हेंबर २००३ साली दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी झाली. त्यानंतर चार पाच वर्षे सुरळीत गेली होती. पण २०१० पासून युद्धबंदी उल्लंघनाच्या घटना घडत आहेत आणि त्या वाढतच चालल्या आहेत. गेल्या वर्षी ३४७ वेळा युद्धबंदीचे उल्लंघन पाकने केले होते आणि या वर्षी नवे सरकार सत्तेवर आल्यापासून या ऑक्टोबरपर्यंत ३३४ वेळा युद्धबंदी उल्लंघन पाकने केले. पाकिस्तानकडून काढली जाणारी ही कुरापत मोदी सरकारसाठी खरे आव्हान आहे, कारण आजवर आपला ‘छप्पन इंचका सीना’ दाखवणार्‍या मोदींकडून पाकिस्तानला कसा धडा शिकवला जातो हे पाहण्यास जनता उत्सुक आहे. यापूर्वीचे सरकार केवळ पोकळ शाब्दिक इशारे देत आले. मोदी सरकार त्यापुढे काही पावले गेले. त्यांनी ‘जशास तसे’ चे आदेश लष्कराला दिले. ‘सगळे लवकरच सुरळीत होईल’ असे मोदींना वाटते, पण सगळे सुरळीत होणार की परिस्थिती आणखी चिघळणार हे स्पष्ट होण्यास काही दिवस जावे लागतील. सध्या सीमेवर जे काही चालले आहे, ते खरे तर अघोषित युद्धच आहे. त्याची परिणती प्रत्यक्ष युद्धामध्ये होऊ द्यायची नसेल, तर दोन्ही देशांदरम्यानच्या संवादाला जागा मिळाली पाहिजे. पण पाकिस्तानची खुमखुमी काही उतरलेली दिसत नाही. परिस्थिती अधिकाधिक चिघळावी आणि संयुक्त राष्ट्रसंघाला मध्यस्थी करण्यास भाग पाडावे, असाच जणू आटापिटा त्याने चालवलेला आहे. अर्थात, पाकिस्तानला जबर तडाखा बसेल, तेव्हाच तो देश नाकदुर्‍या काढील आणि माघार घेईल!