जलीकट्टू स्पर्धेवेळी 7 जणांचा मृत्यू

0
0

तामिळनाडूमध्ये जलीकट्टू दरम्यान एकाच दिवसात सात जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी पोंगल निमित्त तामिळनाडूतील विविध ठिकाणी जलीकट्टू स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी 400 हून अधिक जण जखमीही झाले असल्याची माहिती काल तामिळनाडू पोलिसांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांपैकी सहा जण स्पर्धा पाहण्यासाठी आलेले प्रेक्षक होते, तर मृतांपैकी एक जण जलीकट्टूमध्ये सहभागी झाला होता. शिवगंगा जिल्हा आणि पुडुकोट्टई येथे या दरम्यान दोन बैलांचाही मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी कन्नम पोंगलचा दिवस होता आणि या दिवशी सर्वाधिक जलीकट्टू खेळला जातो. पुडुकोट्टई, करूर आणि त्रिची जिल्ह्यांमध्ये झालेल्या जलीकट्टू कार्यक्रमांमध्ये एकूण 156 लोक जखमी झाले. त्यात 17 बैलमालकांचाही समावेश होता.
शिवगंगा जिल्ह्यात जलीकट्टू स्पर्धेत सहभागी झालेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर मदुराईमध्ये या स्पर्धेदरम्यान बैलाने एका प्रेक्षकाला जखमी केले होते. त्यानंतर त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला. याशिवाय राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आणखी 5 जणांचा मृत्यू झाला. या वर्षीची जलीकट्टूची पहिली स्पर्धा पुडुक्कोटाईच्या गंडारावकोट्टई परिसरात झाली होती. या मृत्यूंमुळे अलिकडच्या वाढलेल्या घटनांमुळे जलीकट्टूभोवतीच्या सुरक्षा उपायांवर पुन्हा वाद सुरू झाला आहे. दरम्यान, पोंगल सणादरम्यान खेळण्यात येणारा जलीकट्टू हा तामिळनाडूचा पारंपरिक खेळ आहे. जलीकट्टू या खेळाचा अर्थ आहे वळूंना वश करणे. या खेळाला 2000 वर्षांची परंपरा आहे.