जलस्रोत खाते वर्षभरात बांधणार नवे 100 बंधारे

0
11

>> जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांची माहिती

>> शेती, बागायतीसाठी होणार पाण्याचा वापर

जलस्रोत खात्याने शेती, बागायतींना पाण्याचा पुरवठा करण्यासाठी राज्यभरात 100 बंधारे बांधण्याचे नियोजन केले असून, मे 2024 पर्यंत या बंधाऱ्यांची कामे पूर्ण केली जाणार आहेत, अशी माहिती जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी काल पर्वरी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

जलस्रोत खात्याने पाण्याचा साठा वाढविण्यावर भर दिला आहे. राज्यातील शेती, बागायतीसाठी पाण्याची योग्य व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न केला जात असून, आत्तापर्यंत 20 बंधाऱ्यांच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे, असे शिरोडकर यांनी सांगितले.

राज्यातील प्रमुख धरणांमध्ये पाण्याच्या साठ्यात वाढ होत आहे. पावसाला विलंब झाल्याने धरणातील पाण्याची पातळी कमी झाली होती; परंतु मागील 15 दिवस पडलेल्या पावसामुळे धरणांतील पाण्याची पातळी समाधानकारक आहे, असेही शिरोडकर यांनी सांगितले.

सत्तरी तालुक्यातील अंजुणे येथील धरणातील पाण्याची पातळी घटल्याने त्या परिसरातील पडोसे जलप्रक्रिया प्रकल्पाला पाण्याचा पुरवठा करण्यासाठी तिळारीचे पाणी नेण्याची योजना तयार करण्यात आली होती; परंतु आता, पावसामुळे वाळवंटी नदीतील पाण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने तूर्त पाणी नेण्याची गरज नाही. भविष्यातील गरज ओळखून पर्यायी व्यवस्था करण्यावर विचार केला जाणार आहे, असेही शिरोडकर म्हणाले.
दरम्यान, राज्य सरकारची म्हादईप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात बाजू भक्कम आहे. गोव्याला पाणी वाटपात निश्चित न्याय मिळणार आहे, असा विश्वास शिरोडकर यांनी व्यक्त केला.

राज्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठा
मागील 15 दिवसांत झालेल्या जोरदार राज्याच्या विविध धरणांतील पाणीसाठा वाढला असून, सद्य:स्थितीत साळावली धरणात 61 टक्के, अंजुणेत 17 टक्के, चापोलीत 65 टक्के, आमठाणेत 66 टक्के, पंचवाडीत 61 टक्के आणि गावणे धरणात 65 टक्के पाणीसाठा आहे.

पाणीटंचाईला ‘साबांखा’च योग्य उत्तर देऊ शकते
ऐन पावसाळ्यात म्हापसा व इतर काही भागांत होणाऱ्या पाणीटंचाईला वेगळी कारणे असू शकतात. जलस्रोत खात्याकडून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जलप्रक्रिया प्रकल्पांना पाण्याचा पुरवठा केला जातो. जलस्रोत खात्याकडे सध्या मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. नागरिकांना पाण्याचे वितरण करण्याचे काम बांधकाम खात्याकडून केले जाते. त्यामुळे पाणीटंचाईबाबत त्या खात्याकडूनच योग्य उत्तर मिळू शकते, असे सुभाष शिरोडकर यांनी संबंधित प्रश्नावर बोलताना सांगितले.