जलशास्त्रज्ञांची कळसा भांडुरा प्रकल्पाला भेट

0
277

>> म्हादई नदीतील पाण्याच्या क्षारांचा करणार अभ्यास

राष्ट्रीय जलशास्त्र संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. गोपाळ कृष्णा आणि डॉ. नितेश पटिदार यांनी काल गुरूवारी कणकुंबी येथील कळसा प्रकल्पाला भेट दिली. त्यांच्यासोबत जलसंसाधन खात्याचे साहाय्यक अभियंते दिलीप नाईक होते. यावेळी या जलशास्त्रज्ञांनी संशोधन आणि अभ्यास करण्यासाठी प्रकल्पाचे निरीक्षण केले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्ली येथील जलशक्ती मंत्रालयाचे गजेंद्रसिंग शेखावत यांची भेट घेऊन कळसा भांडुरा प्रकल्पामार्फत गोव्याकडे येणारे पाणी मलप्रभेत वळवले तर तिची क्षारता वाढून गोव्याच्या पर्यावरण व परिसंस्थेवर गंभीर परिणाम होणार असल्याची माहिती दिली होती.

त्यानंतर जलसंचालनालय मंत्रालयाने म्हादई नदीतील क्षारांचा अभ्यास करण्यासाठी राष्ट्रीय जलशास्त्र समिती नियुक्त केल्याचे घोषित केले होते. त्यानुसार या संस्थेच्या या दोन शास्त्रज्ञांनी पाहणी केली.

पारवडला जाऊन पहाणी
कणकुंबी येथे कळसा कालव्याचा संगम पारवड येथून येणार्‍या सीमेची न्हय येथे होतो. तेथे जाऊन या शास्त्रज्ञांनी क्षारतेची पाहणी केली. त्यानंतर कळसा नाल्याचे पाणी जिथून मलप्रभेत जाते तेथे आणि वाळवंटीच्या पाण्याच्या क्षारतेची घोटेली, साखळी पिळगाव येथे पाहणी केली. हे दोन्ही शास्त्रज्ञ म्हादई नदीच्या विविध ठिकाणी भेट देऊन क्षारतेसंदर्भात निरीक्षणे नोंद करतील.

कर्नाटक सरकार कळसा भांडुरा प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असून त्याच्या पूर्ततेसाठी आवश्यक अहवाल केंद्रीय जलआयोगाला सादर केलेला आहे. या कळसा प्रकल्पासाठी गोव्याच्या ना हरकत दाखल्याची गरज गरज नसल्याचे या पूर्वी जलशक्ती मंत्रालयाने स्पष्ट केलेले आहे.

अहवालावर भवितव्य
गोवा सरकारची अवमान याचिका व विशेष याचिका सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला येणार आहे. त्यावेळी गोवा सरकारला पर्यावरणीय संवेदनशीलता व पश्चिम किनारपट्टीतील क्षारता याबाबत आवश्यक पुरावे न्यायालयात सादर करावे लागणार आहेत. त्या दृष्टीने राष्ट्रीय जलशास्त्र संस्था आपला अहवाल कसा देते यावर याचिकेचे भवितव्य ठरणार आहे.