रविवारी पणजीतील भाटले परिसरात जलवाहिनीला तडा गेल्याने सदर परिसरातील निवासी घरांत पाणी शिरल्याने लोकांची तारांबळ उडाली. पाणी घरात शिरल्याने विजेवर चालणाऱ्या वॉशिंग मशीन, फ्रीज व अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तूंप्रमाणेच फर्निचर तसेच घरात आणून ठेवलेल्या अन्नधान्याचे आदींचे नुकसान झाले. त्याशिवाय घरांच्या आजूबाजूच्या परिसरात पाणी शिरल्याने तो परिसर चिखलमय झाला. भाटले येथे स्मार्ट सिटीचे काम चालू आहे. स्मार्ट सिटीचे काम चालू असताना ही जलवाहिनी फुटल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता; मात्र स्पार्ट सिटीचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने आपल्या कामामुळे ही जलवाहिनी फुटली नसल्याचा खुलासा केला आहे. ही जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, ही जलवाहिनी फुटली, त्याला स्मार्ट सिटीच्या कामाचा कंत्राटदार जबाबदार असून, त्याने लोकांचे जे नुकसान झाले आहे त्याची भरपाई करावी, अशी मागणी पणजीचे माजी महापौर व नगरसेवक उदय मडकईकर यांनी केली आहे. ही जलवाहिनी फुटल्याने भाटले येथील धनलक्ष्मी इमारत व आजूबाजूंच्या घरांचे बरेच नुकसान झाले असल्याचे मडकईकर यांनी सांगितले. मात्र, स्मार्ट सिटीचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने आपल्या कामामुळे या जलवाहिनीला तडा गेला नसल्याचे स्पष्ट केले आहे.