– रमेश सावईकर
खणगिणी – नुवे येथील समुद्रात पर्यटन जलक्रीडा बोट उलटल्याने तीन रशियन महिला पर्यटकांचा बुडून दुर्दैवी अंत झाला. पर्यटन जलक्रीडा बोटींना जलसफरीसाठी समुद्रात जाऊ नका, असा इशारा देऊनही तो धुडकावून बोट चालकाने जलसफरीसाठी आपली बोट समुद्रात नेली. १४ पर्यटकांपैकी ११ जणांचे प्राण वाचविण्यात किनार्यावरील जीवरक्षकांना यश आले. तथापि जलसफरीचा आनंद लुटण्यासाठी जलक्रीडा बोटीतल्या तीन रशियन महिला पर्यटकांना नाहक आपले प्राण गमवावे लागले. त्या बिचार्यांना वादळाची काय कल्पना? वास्तविक बोटचालकाने त्यांना पूर्वकल्पना देऊन जलसफर करणे धोक्याचे आहे हे बजावून सांगण्याची गरज होती, पण सर्व नियम, इशारे धाब्यावर बसवून पर्यटकांच्या जिवावर अफाट नफा उकळीत पर्यटन व्यवसाय करण्याची सवय जडलेले हे बोटचालक, पर्यटकांचा विचार कसा करणार? त्यांच्यावर ना सरकारचे नियंत्रण, ना पर्यटन खात्याचे, ना कॅप्टन ऑफ स्पोर्टस्चे! पर्यटन बोटींचे रीतसर परवाने न घेता, बोटचालक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र नसलेले व जीवरक्षकाची कला-कौशल्ये नसलेले हे बोटचालक पर्यटकांच्या जीवाशी खेळतात. त्यांना आवरण्याची गरज आहे. या गोष्टीची जाणीव गेल्या सप्ताहात घडलेल्या दुर्घटनेमुळे पर्यटन खात्यासह शासन यंत्रणेला झाली आहे. या घटनेनंतर पर्यटक जलक्रीडा प्रकारांवर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हवामान पूर्ववत होईपर्यंत जलसफरी बंद ठेवल्या जातील, पण नंतर जलक्रीडा पुनश्च सुरू करण्यात येतील. त्यावेळी जलपर्यटन व्यवसायासंबंधीचे धोरण, नियम, अटी व पथ्ये यांची व्यवस्थित अंमलबजावणी पर्यटक बोटींचे मालक व चालक करतील यावर करडी नजर सरकारने ठेवावी लागेल.
समुद्रकिनार्यावरील जलक्रीडांचे (वॉटर स्पोर्टस्) सुरक्षा ऑडिट करण्याचा निर्णय पर्यटन खात्याने घेऊन एक चांगले पाऊल उचलले आहे. वास्तविक हे ऑडिट दरवर्षी करण्याची गरज आहे. सध्या राज्यात समुद्रकिनार्यावर उत्तर व दक्षिण गोव्यातील पर्यटनस्थळी सुमारे दीड हजार जलक्रीडा बोटी आहेत. २०१२ झाली ही संख्या हजारांच्या घरात होती. जलक्रीडा पर्यटनाचे आकर्षण वाढले आहे हे यावरून सिद्ध होते. उत्तर गोव्यातील दोनापावला, करंजाळे, कळंगूट, बागा, कांदोळी, सिकेरी आणि दक्षिण गोव्यातील कोलवा, वार्का, केळशी, बाणावली, मोबोर, माजोर्डा आदी समुद्रकिनारी जलक्रीडा प्रकार तेजीत चालतात. दोन वर्षांपूर्वी राज्य सरकारने पर्यटन धोरणानुसार जलक्रीडा प्रकारांचे नियमन निश्चित केले आहे. बोटीसाठी परवाना देताना बोटींची तपासणी आवश्यक आहे. तसेच सूर्यास्तानंतर बोटी बंद ठेवण्याची अट आहे. वादळी हवामानाच्यावेळी हवामान खात्याने इशारा दिल्यानंतर बोटी बंद ठेवण्याची सक्ती आहे. या सर्व कायदे, नियम, अटी, बंधन यांचे काटेकोरपणे पालन होते की नाही यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी पर्यटन खात्याच्या यंत्रणेची. पण या जबाबदारीची जाणीव असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. म्हणूनच जलक्रीडा प्रकारासाठी समुद्रात बोटी नेणारे चालक आपला मनमानी कारभार करतात. पर्यटकांच्या जिवाचे रक्षण करणे, त्यांना सुविधा उपलब्धी देणे ही आपली जबाबदारी ते मुद्दाम डावलतात. पर्यटकांना जलसफरीबाबत आकर्षित कसे करायचे, त्यांच्याकडून अवाजवी पैसे कसे उचलायचे नि आपला धंदा तेजीत – मस्तीत कसा चालवायचा यावर हे बोटचालक लक्ष केंद्रित करतात. त्यांना विचारणारा कोण आहे? आणि समजा पोलीस अधिकारी वा अन्य कोणी सरकारी अधिकार्याने कानउघडणी केली, तर त्याच्या हातावर दक्षिणा ठेवली की त्यांची वाचा बंद, असे सर्रास चालते. नुवे येथे ज्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली, त्यावेळी अन्य बोटचालकही जलसफर करीत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. उत्तर गोव्यातही जलक्रीडा प्रकार वादळी वार्याचा धोका असूनही चालू ठेवण्यात आला नसेल कशावरून? निलोफर वादळ अरबी समुद्रातून पुढे सरकत असताना त्याचा वेग मोठा होता. त्याबाबतच्या सूचना, इशारेही देण्यात आले होते. पण त्याची पर्वा केली गेली नाही. जलक्रीडा प्रकार विषयक पर्यटन व्यवसाय करणार्यांना पर्यटकांच्या जिवाची अजिबात पर्वा नाही. पैसे भरून जलसफरी करणार्या पर्यटकांच्या जिवाशी खेळण्याचा अधिकार बोटचालकांना दिलेला नसतो. कॅप्टन ऑफ स्पोर्टस्, पर्यटन खाते आपल्या अधिकारांचा उपयोग करू शकते. पण सारी नियम व शासन यंत्रणाच खिळखिळी झाली आहे किंवा ढिम्म बनली आहे. त्यामुळे कुणाचा पायपोस कुणाला नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
जलसफरी करणार्या बोटींचे चालक हे प्रशिक्षण प्रमाणपत्रधारक असणे गरजेचे आहे. शिवाय त्याला जीवरक्षण कौशल्य अवगत असायला हवे. बोटीसोबत मदतकार्य करणारी दुसरी बोट जलसफरीच्या वेळी जवळपास ठेवणे आवश्यकच नव्हे तर नियमानुसार सक्तीचे आहे, पण त्यांचे पालन अजिबात होत नाही.
धोकादायक हवामान व अन्य परिस्थितीवेळी पर्यटक जलसफरी बोटी बंद ठेवण्याकडे शासन यंत्रणेने कटाक्ष ठेवला पाहिजे. जे नियमांचे, आदेशाचे पालन करीत नाहीत, त्यांचे परवाने रद्द केले पाहिजेत. समुद्रकिनारी जीवरक्षक नेमण्यात आल्याने कितीतरी जणांचे प्राण वाचतात. बोटीचे चालक व्यवसाय – नफ्याच्या लोभापायी धोका पत्करून पर्यटकांच्या जिवाशी खेळण्यापर्यंत मजल मारतात, त्यावेळी त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा नोंदवून कडक कारवाईची शिक्षा व्हायला हवी. फक्त दंडात्मक कारवाई करून भागणार नाही. बोटचालकांच्या मनमानी कारभारावर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस गस्त वाढवावी लागेल. शिवाय पर्यटन व्यवसायात गुंतलेले जलक्रीडा बोट चालक-मालक नियम-कायद्यांचे काटेकोरपणे पालन करतात की नाही यासाठी नियमित, आकस्मिक तपासणी झाली पाहिजे.
खणगिणी – नुवे येथील बोटींच्या दुर्घटनेत तीन रशियन महिला पर्यटकांचे बुडून निधन झाल्याने सारी पर्यटन यंत्रणा हादरली. खडबडून जागी झाली. संबंधित बोट मालक व चालक यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात येऊन पोलिसांनी त्यांना अटक केली. आता त्यांना काय शिक्षा होते ते कालांतराने कळेलच. पण एक महत्त्वाची बाब म्हणजे ही घटना स्मृतीआड झाली की काही काळानंतर अल्पावधीतच ‘पुन्हा येरे माझ्या मागल्या’ अशी परिस्थिती निर्माण होणार नाही याची दक्षता बाळगली पाहिजे. पर्यटकांच्या जिवाशी खेळ खेळणार्यांचा अजिबात मुलाहिजा ठेवला जात नाही, त्यांना कडक शिक्षा भोगावी लागते, असा भययुक्त दरारा निर्माण झाल्याशिवाय जलसफरी बोट चालकांची मनमानी व घातकी वृत्ती बदलणार नाही. वास्तविक सारा दोष बोट चालकांचाही नाही. पर्यटनाचा आनंद लुटून मौजमजा करण्यासाठी येणारे पर्यटकही नको ती साहसे-धाडस करतात. जिवावर बेतण्याचा धोका असणारी साहसे बोटचालकांनी मुळीच करता कामा नयेत.
जलक्रीडा प्रकार पर्यटनक्षेत्रात घडणार्या अशा प्रकारामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर गोव्याची बदनामी होते. ती होऊ नये म्हणून जलक्रीडा पर्यटक क्षेत्रात जिवास धोका निर्माण करणारी परिस्थिती उद्भवणार नाही याची काळजी घ्यावयास हवी. तात्पुरत्या उपायांच्या मलमपट्टीने काही साध्य होणार नाही. कायमस्वरूपी उपाय योजण्याची नितांत गरज आहे. पर्यटन व्यवसाय हा गोव्याचा महसूल उत्पन्नाचा एक प्रमुख स्त्रोत आहे. म्हणून राज्यातील पर्यटन हे आंतरराष्ट्रीय स्तराइतपत सुरक्षित, सुविधा-उपलब्ध असावयास हवे. तरच आंतरराष्ट्रीय स्तरावर गोव्याची प्रतिमा उंचावेल. गोवा राज्य पर्यटनासाठी एक आकर्षण म्हणून टिकवून ठेवायचे असेल तर संबंधित गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही. गोवा राज्य शांत, सुरक्षित, निसर्ग-सुंदर म्हणून जागतिक पातळीवर अजूनही ओळखले जाते. ही गोव्याची शान वाढवणारी आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिमा कायम टिकवून ठेवण्यासाठी योग्य पर्यटन धोरणाची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावीच लागेल!