– सुधाकर नाईक
रिओ द जानेरोमधील ऐतिहासिक मार्काना स्टेडियमवर गेल्या रविवारी ७४,७३८ फुटबॉलशौकिनांच्या सापेक्ष रंगलेल्या विश्व चषक महासंग्रामात, अंतिम लढतीत उमद्या जर्मनीने तूल्यबळ अर्जेंटिनावर मात करून चौथ्यांदा विश्व चषक अजिंक्यपदाचा मान पटकावला. विशेष म्हणजे दक्षिण अमेरिकेत विश्व चषक जिंकणारा पहिला युरोपीयन संघ बनण्याचा सुवर्णाध्याय फिलिप लॅहमच्या नेतृत्वाखालील जर्मनीने लिहिला. १९५४ (बेर्न, इंग्लंड), १९६४ (प. जर्मनी) आणि १९९० (रोम, इटाली), नंतर तब्बल चोवीस वर्षांनी ज्योकिम लोवे यांच्या मार्गदर्शनाखाली जर्मनीने पुन्हा एकदा जागतिक फुटबॉलमध्ये श्रेष्ठत्व प्रस्थापित करतानाच दोन दशकानंतर ताज्या फिफा रँकिंगमध्येही ‘नंबर वन’ स्थान प्राप्त केले.
‘मिरॅकल बॉय’ मारिओ गॉएत्झने ११३ व्या मिनिटाला नोंदवलेल्या गोलवर जर्मनीने अर्जेंटिनावर मात करीत २४ वर्षांनंतर पुन्हा एकदा आपले श्रेष्ठत्व अधोरेखित केले. ८८ व्या मिनिटाला राखीव म्हणून उतरलेल्या २२ वर्षीय बालिश चेहर्याच्या मारिओने २५ मिनिटात ऐतिहासिक कामगिरी नोंदवीत विश्व चषक अंतिम लढतीत गोल नोंदणारा सर्वांत लहान खेळाडू बनण्याचे भाग्यही प्राप्त केले.
ज्योकिम लोवे यांच्या मार्गदर्शनाखाली जर्मनीने सुसूत्रबद्ध आणि सुसंगठित खेळीत चार वेळा ‘बॅलन डी ओर’ पुरस्कार विजेता विश्वश्रेष्ठ खेळाडू लियोनेल मेस्सीच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिनावर कुरघोडी केली. दोन वेळच्या विश्व विजेत्या अर्जेंटिनाने विश्व चषकाच्या ८४ वर्षांच्या इतिहासात ‘एक्स्ट्रा टाइम’मध्ये गोल स्वीकारलेला नव्हता, पण पोरसवदा वाटणार्या गॉएत्झने ‘एक्स्ट्रा टाइम’मधील उत्तरार्धात ‘विस्मयकारी’ गोल नोंदवीत अर्जेंटिनाला सुन्न बनविले. जर्मन भाषेत गॉएत्झ म्हणजे देवदूत, आणि मारिओनेही आपल्या नावास साजेशा कामगिरीत देशाची शान उंचावली.
२०१४ फिफा विश्व चषक फुटबॉल स्पर्धा ६४ वर्षांनंतर ब्राझिलमध्ये परतल्याने यजमान सहाव्यांदा विश्व चषकावर नाव कोरणार असे बहुतेकांचे मत होते. ब्राझिल आणि अर्जेंटिना या दक्षिण अमेरिकन संघांत जेतेपदासाठी चुरस होणार अशी भाकितेही झाली होती. पण जर्मनीच्या विस्मयकारी कामगिरीमुळे फुटबॉलतज्ज्ञांचे आडाखे कोलमडले आणि त्यांच्या चाहत्यांचाही घोर अपेक्षाभंग झाला.
गतविजेता स्पेन, इटली आणि इंग्लंडचे आव्हान पहिल्या फेरीतच संपुष्टात आले. ब्राझिलने उपउपांत्य फेरीत कोलंबियावर २-१ अशी मात करीत उपांत्य फेरी गाठली, पण हा सामना यजमानांसाठी बराच महाग पडला. ब्राझिलचा स्टार स्ट्रायकर नेमार प्रतिस्पर्धी बचावपटूने दिलेल्या धडकेमुळे पाठीच्या मणक्याला झालेल्या दुखापतीने स्पर्धेबाहेर गेला, तर कर्णधार थियागो सिल्वा दुसर्या यलो कार्डमुळे एका सामन्यासाठी निलंबित झाला. या दोन धक्क्यांतून सावरू न शकलेल्या ब्राझिलची उपांत्य फेरीत जर्मनीकडून ७-१ अशी धूळधाण झाली. एवढेच नव्हे तर या दु:खावर दागण्या म्हणून की काय तिसर्या स्थानासाठीच्या लढतीतही नेदरलँडकडून ३-० अशी पराभवाची मानहानी पत्करावी लागली. याउलट लियोनल मेस्सीच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिनाने सावध वाटचालीत अंतिम फेरी गाठली. उपउपांत्य फेरीत बेल्जियमवर १-० असा निसटता विजय मिळविलेल्या अर्जेंटिनाने उपांत्य फेरीत गोलरक्षक रोमेरोच्या प्रभावी कामगिरीवर नेदरलँडवर ४-२ अशी मात करीत अंतिम फेरी गाठली. प्राथमिक फेरीनंतर गोल नोंदण्यात यश न आलेला मेस्सी अंतिम फेरीत गोल नोंदवून फुटबॉल विश्वातील महान खेळाडूंत स्थान मिळविणार अशी अपेक्षा होती. पेले, झिनेदिन झिदान, रोनाल्डो तसेच १९८६ मध्ये ‘हँड ऑफ गॉड’ गोलद्वारे अर्जेंटिनाला विश्व विजेतेपद मिळवून दिलेला डायगो मारादोना यांच्या पंक्तीत विद्यमान कालखंडातील महान खेळाडू मेस्सी स्थान मिळविणार असे वाटत होते, पण अंतिम क्षणात मिळालेल्या ‘फ्री-किक’वरही सुदैवाची साथ लाभली नाही आणि ‘गोल्डन बॉल’ पुरस्काराचा मानकरी ठरूनही बार्सिलोनाच्या स्टार स्ट्रायकरला दिलासा लाभू शकला नाही.
‘धीरगंभीर’ ज्योकिम लोवेच्या मार्गदशर्ंनाखालील जर्मनीने ३२ दिवसांच्या या प्रतियोगितेतील अपराजित वाटचालीत घानाविरुद्धची उत्कंठावर्धक २-२ बरोबरी वगळता, सातपैकी सहा सामने जिंकले. उपांत्य फेरीत यजमान ब्राझिलची ७-१ अशी धुळधाण उडवीत जर्मनीने जेतेपदाचे आपणच दावेदार असल्याचे दर्शविले होते आणि अखेर अंतिम लढतीत १९९० मधील अंतिम मुकाबल्याची पुनरावृत्ती घडवीत आपले श्रेष्ठत्व अधोरेखित केले. इटलीत झालेल्या त्या अंतिम लढतीतही जर्मनीने अर्जेंटिनावर १-० अशीच मात केली होती. ३२ संघांच्या या प्रतियोगितेत ज्योकिम लोवेच्या मार्गदर्शनाखालील संघाने सांघिक कामगिरीत विश्व चषक अजिंक्यपद पटकावीत आपले श्रेष्ठत्व अधोरेखित केले. ३२ दिवस चाललेल्या या प्रतियोगितेत १७१ गोलांची नोंद झाली आणि त्यात सर्वाधिक १८ गोल नोंदणारा संघ बनण्याचा मानही जर्मनीला मिळाला. बहुसंख्य संघांची भिस्त एखाद-दुसर्या खेळाडूवर असायची, पण जर्मनीतर्फे आठ ते नऊ खेळाडूंनी गोल नोंदण्याची किमया साधली. २००२ मधील विश्व चषकात खेळलेला ज्येष्ठ स्ट्रायकर मिरोस्लाव क्लोज, कर्णधार फिलिप लॅहम, बॅस्टियन श्चैनस्टैगर या ‘ओल्ड वॉर हॉर्स’सह मारिओ गॉएत्झे (२२), थॉमस मुल्लर (२४), मेसूत ओझिल (२६), टोनी क्रूस (२४), जेरोम बॉएतेंग (२५) आणि आंद्रे स्चूरेल (२४) या युवा दमाच्या खेळाडूंमुळे अनुभवी आणि युवाकौशल्याचा सुरेख मिलाप जर्मन संघात होता आणि ‘गोल्डन ग्लोव्हज’ चषक विजेत्या मॅन्युएल नेवराचे अभेद्य गोलरक्षण हे त्याचे अभेद्य सुरक्षाकवच होते.
जर्मनीच्या गेल्या दशकभरातील युवा विकसन मोहिमेचे हे फलित असल्याचे प्रशिक्षक लोवे यांनी विजेतेपदानंतर अभिमानाने सांगितले. नैपुण्यकुशल खेळाडू घडविण्याच्या संकल्पना यशस्वीपणे राबविल्याने जर्मनीला एकाहून एक सरस युवा खेळाडू लाभले आणि त्याचेच फलित म्हणजे अंतिम लढतीत राखीव आंद्रे स्चूरलने दिलेला सुरेख पास आणि त्याला तेवढाच न्याय देताना मारिओ गॉएत्झने चेंडू छातीवर झेलल्यानंतर सुंदर ‘व्हॉली’ फटका मारून प्रतिस्पर्धी गोलरक्षकाला मुळीच संधी न देता चेंडू जाळीत घुसविला आणि जर्मनीचे चौथ्या विश्व चषक अजिंक्यपदाचे स्वप्न साकारले!
जर्मनीच्या गेल्या दशकभराच्या कामगिरीचा आलेख पाहता ज्योकिम लोवेचा संघ यंदा अजिंक्यपद पटकावील असा विचारही कुणाच्या मनाला शिवला नसेल, पण युरोपियन देशाची युवा विकसन मोहीम अखेर फळाला आली. विश्व चषकाबरोबरच जर्मनीने दोन दशकानंतर फिफा रँकिंगमध्ये सर्वोच्च स्थान मिळवीत आपल्या श्रेष्ठत्वावरही शिक्कामोर्तब केले. उपविजेत्या अर्जेंटिनाने तीन क्रम उंचावताना ताज्या रँकिगमध्ये द्वितीय स्थान मिळविले तर विश्व चषकात तिसरे स्थान मिळविलेल्या नेदरलँडला तृतीय क्रमांक मिळाला. विजेतेपदाचे स्वप्न भंगलेल्या ब्राझिलला सातव्या तर पहिल्या फेरीतच आव्हान संपुष्टात आलेल्या गतविजेत्या स्पेनला आठव्या क्रमांकावर घसरावे लागले. स्पर्धेंत सर्वाधिक गोल नोंदलेल्या जेम्स रॉड्रिगिशच्या कोलंबियाला चौथे स्थान मिळाले.
गेल्या दशकभरात प्रमुख स्पर्धांत विशेष ठसा उमटवू न शकलेल्या जर्मनीने पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त केलेले असून आपला हा जोष आगामी कन्ङ्गेडरेशन कप तथा अन्य प्रमुख स्पर्धांत जारी राखील अशी अपेक्षा बाळगणे अनाठायी न ठरावे!
फिफा विश्व चषक विजेते
यजमान विजेते उपविजेते गोलफरक
विजेते उपविजेते गोलफरक
२०१४ ब्राझिल जर्मनी अर्जेंटिना (१-०)
२०१० द. आफ्रिका स्पेन नेदरलँडस (१-०)
२००६ जर्मनी इटाली फ्रान्स (१-१,
पेनल्टी ५-३)
२००२ जपान/द. कोरिया ब्राझिल जर्मनी (२-०)
१९९८ फ्रान्स फ्रान्स ब्राझिल (३-०)
१९९४ अमेरिका ब्राझिल इटाली (०-०,
पेनल्टी ३-२)
१९९० इटाली जर्मनी अर्जेंटिना (१-०)
१९८६ मेक्सिको अर्जेंटिना जर्मनी (३-२)
१९८२ स्पेन इटाली जर्मनी (३-१)
१९७८ अर्जेंटिना अर्जेंटिना हॉलंड (३-१)
१९७४ जर्मनी जर्मनी हॉलंड (२-१)
१९७० मेक्सिको ब्राझिल इटाली (४-१)
१९६६ इंग्लंड इंग्लंड जर्मनी (४-२)
१९६२ चिली ब्राझिल झेकोस्लोवाकिया (३-१)
१९५८ स्वीडन ब्राझिल स्वीडन (५-२)
१९५४ स्वित्झर्लंड जर्मनी हंगेरी (३-२)
१९५० ब्राझिल उरुग्वे ब्राझिल (२-१)
१९४६ – – – –
१९४२ – – – –
१९३८ फ्रान्स इटाली हंगेरी (४-२)
१९३४ इटाली इटाली झेकोस्लोवाकिया (२-१)
१९३० उरुग्वे उरुग्वे अर्जेंटिना (४-२)