अमेरिकेतील प्रदीर्घ वैद्यकीय उपचारांअंती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे गोव्यात आगमन झाले आणि लगेच त्यांनी स्वतःला आपल्या स्वभावानुरूप राज्याच्या कामकाजाला जुंपूनही घेतले. अमेरिकेहून कित्येक तासांचा हवाई प्रवास करून दाबोळी विमानतळावर उतरलेले पर्रीकर स्वतःच्या पायांनी तरातरा चालत गाडीत जाऊन आपल्या नेहमीच्या शैलीत पुढच्या आसनावर बसताना गोव्याच्या जनतेने दूरचित्रवाणी वाहिन्यांवर पाहिले तेव्हा तिच्या मनातील शंका-कुशंकांचे काहुर दूर झाले, किंबहुना तसा संदेश जनतेमध्ये जावा यासाठी त्यांनी ही ऊर्जा दाखविली असेल. गेल्या वेळी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात स्वतः अर्थसंकल्प मांडण्यासाठी आलेले पर्रीकरही असेच उत्साहात तरातरा चालत आले होते, परंतु नंतर त्याचे दुष्परिणाम त्यांच्या शरीरावर दिसून आले. तसे पुन्हा मुळीच घडू नये अशी गोमंतकीय जनतेची इच्छा आहे. त्यामुळे आपल्या शरीराला जसे आणि जेवढे झेपतील तेवढेच श्रम त्यांनी घ्यावेत अशीच आज जनतेची प्रामाणिक आणि निरपेक्ष भावना आहे. घरी परतल्यावरही स्वस्थ न बसता आपल्या श्रद्धेनुरुप देवदर्शन करून आपल्या मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार पर्रीकर यांनी लागलीच हाती घेतला आणि पूर्वीप्रमाणे कामाचा धडाकाही लावला. त्यांच्या या धडाडीचे उदंड कौतुकही झाले, परंतु एका गंभीर आणि दुर्धर आजाराचा सामना गेले चार महिने त्यांनी केला आहे आणि त्यातून ते नुकतेच कुठे बाहेर आले आहेत हे त्यांनी आणि जनतेनेही विसरून चालणार नाही. गेले चार महिने ढेपाळलेले राज्याचे प्रशासन, प्रलंबित राहिलेले खाण प्रश्नासारखे जटिल प्रश्न यामुळे आपल्या गोव्यातील आगमनानंतर हे सगळे विषय वेगाने मार्गी लावण्याची इच्छा पर्रीकर यांच्या मनात येणे आणि त्यानुसार त्यांनी कामाचा झपाटा लावणे साहजिक आहे, परंतु तहानभूक विसरून रात्रंदिवस सोळा सोळा तास काम करण्याच्या परिस्थितीत आज आपण नाही ही वस्तुस्थिती त्यांनी स्वीकारायला हवी. तसा हट्टाग्रह धरू नये. ते आपल्या आजारातून पूर्णपणे बरे झाले असतील तर ती गोव्यासाठी अतिशय आनंदाचीच गोष्ट आहे, परंतु जोवर डॉक्टर त्यांना परवानगी देत नाहीत, तोवर स्वतःच्या प्रकृतीची तमा न बाळगता राज्याच्या कारभाराला अविश्रांत वाहून घेणे योग्य ठरणार नाही. कोणतेही काम न करता घरी स्वस्थ बसून विश्रांती घेणे त्यांच्यासारख्या कार्यमग्न व्यक्तीला रुचणार नाही हे जरी खरे असले तरी आपल्यावर आजारपणामुळे आलेल्या मर्यादा त्यांनी ओळखणे आणि त्यानुसार आपल्या दिनक्रमामध्ये बदल करणे आज अपेक्षित आहे. राज्याचा कारभार त्यांच्यासारखा कार्यक्षम नेता आपल्या हाती पुन्हा घेतो आहे ही गोव्याच्या दृष्टीने स्वागतार्ह बाब आहे, परंतु स्वतःवरील कामाचा ताण त्यांनी कमी करावाच लागेल. त्यासाठी सर्वांत पहिली बाब म्हणजे स्वतःपाशी ठेवलेली सर्व छोटी – मोठी खाती स्वतःकडेच ठेवण्याचा अट्टहास न ठेवता त्यांचे वाटप सहकार्यांकडे करायला हरकत नसावी. चांगल्या नेतृत्वाचे लक्षण स्वतःच सगळी कामे डोक्यावर घेण्यापेक्षा सहकार्यांकडून स्वतःला हवी तशी कामे करवून घेणे हे असते. त्यामुळे गृह, अर्थ यासारखी मुख्यमंत्र्यांकडे परंपरेने असणारी खाती वगळता इतर खात्यांचे वाटप सहकारी मंत्र्यांकडे करून त्यावर नजर ठेवणे त्यांना अशक्य ठरू नये. राज्यासमोर अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत. खाण प्रश्न हा त्यातील एक. त्याकडे त्यांनी सर्वांत आधी लक्ष दिले आहे. संबंधितांची बैठक बोलावली आहे. पर्रीकर आता परतले असल्यामुळे आपल्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी कोणी तरी आपल्याला वाली मिळाला आहे अशी खाणग्रस्त जनतेमध्ये आज भावना दिसते. मध्यंतरी वीज खात्याने तिसवाडीच्या जनतेला वीस तास अंधारात ठेवण्याच्या प्रकारावर उमटलेल्या प्रतिक्रियांचीही मुख्यमंत्र्यांनी आल्या आल्या दखल घेतली आहे आणि राज्यातील वीज पुरवठ्यातील अडचणींवर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या अनुपस्थितीत सुस्तावलेले प्रशासन पुन्हा मार्गी लावायचे आहे. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत काही अधिकारी मंत्र्यांना जुमानेनासे झाले होते. प्रशासनाला पुन्हा एकदा शिस्त लावावी लागेल. प्रशासनाची गती वाढवावी लागेल. सरकारपुढे आव्हाने अनेक आहेत. त्यांना सामोरे जायचे आहे. विरोधी कॉंग्रेस पक्ष आता पूर्वीइतका दुबळा राहिलेला नाही. लोकसभा निवडणूक अवघ्या एका वर्षावर येऊन उभी आहे. तिच्या प्रचाराच्या जबाबदारीतून पर्रीकर यांना दूर ठेवण्याचा निर्णय भाजपाने जरी घेतलेला असला तरी पर्रीकरांविना प्रचार पक्षासाठी सोपा नसेल. त्यांच्या आजारपणात जनतेचे निर्व्याज प्रेम जसे त्यांना अनुभवायला आले, तसेच तिच्या अपेक्षांचे ओझेही अनुभवायला निश्चित आलेले असेल. जनतेच्या त्या अपेक्षा पूर्ण करणे आणि हे आघाडी सरकार सुरळीत चालवणे यापुढेही आव्हानात्मक राहणार आहे. आव्हाने म्हटली की ताण – तणाव आलेच. त्यामुळे त्यांचा आपल्या शरीरावर दुष्परिणाम होऊ न देता आपल्या आरोग्यासंदर्भातील वस्तुस्थितीचे भान राखून मुख्यमंत्र्यांनी राज्याची सेवा बजावावी. भलता उत्साह दाखवू नये!