गोवा मुक्तीच्या हीरक महोत्सवी वर्षाला आज प्रारंभ होत आहे. आजपासून सरकारी पातळीवरही हे वर्ष विविध कार्यक्रम – उपक्रमांनिशी साजरे केले जाणार आहे, परंतु या उत्सवापेक्षाही गेल्या सहा दशकांमध्ये गोव्याने कुठवर झेप घेतली आणि कुठे जायचे आहे; काय केले नि काय करायचे राहिले याचे सिंहावलोकन करण्याची ही खरी वेळ आहे.
मुक्तीनंतर गोव्याला कै. भाऊसाहेब बांदोडकर यांच्यासारखा अगदी तळागाळाशी, बहुजनांशी घट्ट नाळ जुळलेला लोकनेता मुख्यमंत्री म्हणून लाभला. खरे तर भाऊसाहेबांच्या ध्यानीमनीही मुख्यमंत्रिपद नव्हते, ते स्वतः तर निवडणुकीलाही उभे राहिले नव्हते. परंतु मगो पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्यानंतर मुख्यमंत्री कोणाला करावे याचा सल्ला विचारण्यासाठी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याकडे गेले असता भाऊंनीच गोव्याचे नेतृत्व करावे असा आग्रह नाईकांनी धरला. शिवाय बॅरिस्टर नाथ पै, एस. एम. जोशी, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी आदींचा दबावही आल्याने आपण राजी झालो असे खुद्द भाऊसाहेबांनीच सांगितले आहे. वसंत वेलिंगकरांनी राजीनामा दिला आणि मडकईमधून भाऊसाहेब रीतसर निवडून आले. गोव्याचे राजकारण त्या काळी किती निःस्पृह होते, लोकप्रतिनिधी किती निरपेक्षपणे समाजजीवनात वावरत होते त्याचे हे उदाहरण पाहा आणि गोव्यातील आजच्या स्वार्थी आणि सत्तालोलुप राजकारणाशी आणि लोकप्रतिनिधींशी त्या काळाची तुलना करा. आपण कोठून कोठे पोहोचलो आहे हे एका क्षणात लक्षात येते. भाऊ आणि त्यांचे प्रमुख राजकीय विरोधक जॅक सिकेरा विधानसभेत भांड भांड भांडायचे आणि संध्याकाळी दोघे एकत्र मासे पकडायला जायचे हा किस्सा तर सर्वश्रृत आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संबंधही आजच्यासारखे तेव्हा विषारी निश्चित नव्हते. राजकारण स्वच्छ होते. ते सेवेचे साधन होते, स्वार्थाचे नव्हे.
भाऊसाहेब हे द्रष्टे नेतृत्व होते. गोव्याला कोणत्या दिशेने पुढे जायचे आहे त्याची दिशा त्यांना पक्की ठाऊक होती. थोडीथोडकी नव्हे तर साडेचार शतके पोर्तुगिजांच्या दमनचक्रात पिचलेल्या या भूमीला तिचा आत्मविश्वास परत मिळवून द्यायचा असेल तर तळागाळामध्ये शिक्षणाची गंगा गेली पाहिजे हे त्यांनी जाणले. त्यातून गावोगावी शाळांचे जाळे उभारण्यासाठी त्यांनी तत्कालीन प्रशासनाला कामाला लावले. गोव्याच्या चौफेर विकासाचा पाया भाऊसाहेबांच्या काळात कसा रचला गेला आहे हे जाणून घ्यायचे असेल तर त्यांच्या कार्यकाळामध्ये राज्यात उभ्या राहिलेल्या वा संकल्प सोडण्यात आलेल्या प्रकल्पांची नामावली तपासावी. त्यात काय नाही? कारखान्यांपासून कला अकादमीपर्यंत आणि धरणापासून विद्यापीठापर्यंतचे गोव्याचे पायाभूत असे प्रकल्प त्या काळामध्येच संकल्पिले गेल्याचे दिसते आणि थक्क व्हायला होते. सार्वमत हरल्यानंतरही जनता त्यांना पुन्हा निवडून देते हे चित्रही किती किती बोलके आहे! ‘भाऊसाहेब, आपण सार्वमत कौल का हरलात’ असे त्यांना म्हणे कोणीतरी विचारले होते, त्यावर ‘माझ्या लोकप्रियतेमुळे’ असे मिश्कील उत्तर भाऊसाहेबांनी दिले होते. दुर्दैवाने भाऊंच्याच कार्यकाळात गोव्यामध्ये सात आमदारांनी बंड पुकारले आणि गोव्यामध्ये फाटाफुटीच्या राजकारणाची कीड लागली. आजही ती नष्ट झालेली नाही.
शशिकलाताईंच्या काळामध्ये देशी भाषांना शिक्षणात सन्मानाचे स्थान देऊन गोव्यातील विशिष्ट घटकाचे भारतीयत्वाशी मनोमीलन घडविण्याचा जो प्रयत्न झाला त्याचे महत्त्वही नाकारले जाऊ शकत नाही. गोवा मुक्त झाला तेव्हा सालाझारचा जयजयकार करणारे लोकही गोव्यात होते आणि बॉम्बस्फोटांद्वारे भारतात सामील होण्यास विरोधही दर्शवला जात होता. पोर्तुगीज दैनिकातून भारतविरोधी प्रचार केला जात होता. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर प्राथमिक शिक्षणापासून देशी भाषांना शशिकलाताईंच्या सरकारने राजकीय फायद्यातोट्याची पर्वा न करता जे मानाचे स्थान दिले, ते ऐतिहासिक पाऊल होते असे आज मागे वळून पाहताना वाटते.
गोव्यामध्ये राजकारणाचे पुढे नवनवे प्रवाह अवतरले. नंतर आलेल्या कॉंग्रेस आणि भाजपच्या सरकारांचाही गोव्याच्या पुढील विकासामध्ये महत्त्वाचा आणि भरीव वाटा राहिला हेही खरे, परंतु गोव्याच्या राजकारणाची बदलत गेलेली दिशा, सर्व क्षेत्रांत बोकाळलेला उथळपणा, स्वार्थांधता, सत्तालोलुपता अस्वस्थ करणारी आहे. आज हीरकमहोत्सवी वर्षात पदार्पण करणारा गोवा एका नव्या वळणावर उभा आहे. अनेक जटिल प्रश्न समोर उभे आहेत. केवळ मुक्तीचे सोहळे साजरे करण्यापेक्षा गतइतिहासाची पाने चाळून आपण आजवर काय गमावले आहे आणि ती त्रुटी भरून काढण्यासाठी आपल्याला काय करायचे आहे याचा विचार करून पुढे जाणेच अधिक इष्ट ठरणार नाही काय?