(विशेष संपादकीय)
मर्यादापुरुषोत्तम श्रीराम बालरूपाने अयोध्येतील आपल्या सदनी पुन्हा विराजमान झाले आहेत. काल त्यांचा निरागस सुहास्यवदनी सात्विक सावळा चेहरा जगापुढे आला. अष्टगंधांचा सुवास जणू दशदिशांत दरवळला. ज्या क्षणाची कोटी कोटी भारतीयांना युगानुयुगे आस लागून राहिली होती, ते स्वप्न आता दिमाखात साकारले आहे. रामलला आपल्या जन्मस्थानी सन्मानाने विराजमान झाले आहेत. येत्या सोमवारी ह्या सुंदर मूर्तीमध्ये विधिवत् प्राणप्रतिष्ठा होईल. श्रीरामजन्मभूमीस्थान परत मिळवण्यासाठी गेली पाचशे वर्षे चाललेला राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि न्यायालयीन संघर्ष लक्षात घेता, असे कधी घडू शकेल, आपल्या जीवनात कधीकाळी हा क्षण अनुभवता येईल असे कोणाला स्वप्नातही वाटले नसेल. परंतु कालचक्रच असे काही फिरले की बघता बघता तो अमृतक्षण आला. कोणत्याही दंग्याधोप्यांविना, अगदी शांततेत, सौहार्दात आणि साऱ्या शंकाकुशंका दूर सारत तो मंगल क्षण आला.
अयोध्या मथुरा माया, काशी कांची अवंतिका । पुरी द्वारावती चैव सप्तैतः मोक्षदायिका’ असे सप्त मोक्षदायी तीर्थक्षेत्रांमध्ये स्थान असलेली रामनगरी अयोध्या वैवत्स मनूने स्थापली. परंतु तिची कीर्ती दिगंतात पोहोचली ती सत्यवचनी, मर्यादापुरुषोत्तम, लोककल्याणकारी प्रभू श्रीरामांची राजधानी झाल्यानेच.
भज रामं द्वापारनायकं भज रामं युगप्रवर्तकम् ।
सार्थकनामो श्रीरामस्य शुचितो युगयुगान्तरो ॥
अर्थ ः भगवान श्रीरामाची उपासना करा, राम नामाचे भजन करा, जो द्वापारयुगाचा नायक आहे, जो युग प्रवर्तक आणि जो युगेयुगे आपल्या सार्थ नावांनी पवित्र आहे.
भर्जनं भवबीजानां अर्जनं सुखसंपदा ।
तर्जनं यमदूतानाम् राम रामेति गर्जनं॥
अर्थ ः रामाचे नाव भवरोग नष्ट करते, सुखसमृद्धीचे ते साधन आहे. राम राम म्हणणे हे यमदूतांना देखील भयभीत करणारे आहे. अशा प्रभू श्रीरामांची भक्ती आणि उपासना हा देश शतकानुशतके श्रद्धायुक्त अंतःकरणांनी करीत आला. श्रीराम आपली सदैव रक्षा करील ह्या दृढ विश्वास त्याने पिढ्यानपिढ्या बाळगला. अशा ह्या लोकोत्तर युगपुरुषाचे जन्मस्थान शतकानुशतकांचे सबळ पुरावे असूनही पारतंत्र्यात अडकले होते. ते मुक्त करण्यासाठी शेकडो वेळा संघर्ष झाला. प्राणांच्या आहूती पडल्या. अखेर हे बलिदान सार्थकी लागले आहे. सरयूतीरावरील ह्या अयोध्यानगरीत श्रीरामजन्मभूमीमंदिर भव्यदिव्य स्वरूपात साकारते आहे आणि अवघा देश राममय होऊन गेला आहे. एक नवे सांस्कृतिक नवजागरण धर्म, जाती, पंथांच्या सीमा भेदून देशामध्ये घडताना दिसते आहे. जणू भविष्यात येऊ घातलेल्या रामराज्याची ही नांदी आहे अशी आशा आणि विश्वास जनमानसामध्ये जागला आहे. आपल्या रोजच्या जगण्यातील सगळे प्रश्न, चिंता, व्यथा, वेदना बाजूला सारून राम ह्या तारकमंत्राने अवघा देश न्हाऊन निघाला आहे. जणू आपल्या जन्माची सार्थकता करणारा, कृतार्थता देणारा हा क्षण आहे ह्या भावनेने या देशातील आबालवृद्धांचे डोळे अयोध्येकडे लागले आहेत.
खरोखर राम आणि कृष्ण ह्या दोन शब्दांमध्ये आपले सारे सांस्कृतिक संचित सामावलेले आहे. भारतीय तत्त्वज्ञानाचा महान वारसा प्राचीन काळीच सर्वदूर पोहोचला. रामनामाची कीर्तीध्वजा तर भारत, नेपाळ, श्रीलंका, इंडोनेशिया, कंबोडिया, मलेशिया, मॉरिशस, सुमात्रा, जावा, थायलंड इथपासून पार साता समुद्रापलीकडील सुरीनाम, त्रिनिदाद, टोबॅगो, गयाना आदी कॅरिबियन बेटांपर्यंत जाऊन पोहोचली. आजही तेथील नागरिक तो वारसा आपापल्या परीने जपत आहेत. आपले रामायण कंबोडियात रिमकर बनून पोहोचले, इंडोनेशियात काकवीन रामायण बनले, मलेशियात श्रीराम ‘सेरी राम’ बनले, कुठे कुठे तर बौद्ध जातककथांच्या रूपातही गेले. सुशासन, दातृत्व, दयाळूपणा, न्याय, सत्यनिष्ठा म्हणजे प्रभू श्रीराम. ‘पुरुषोत्तम’ कसा असावा ह्याचे हे मूर्तिमंत उदाहरण. त्यामुळेच विष्णूचा सातवा अवतार म्हणून भारतीय जनमानसात त्याला चिरस्थायी स्थान मिळाले. युगानुयुगे त्याची भक्ती केली गेली. राम कसा आहे?
रामो विग्रहवान् धर्मः साधुः सत्यपराक्रमः ।
राजा सर्वस्य लोकस्य देवानां मधवानिव ॥
अर्थ ः राम रूपशाली आहे, धर्माचे प्रतीक आहे. सच्चा आहे आणि पराक्रमीही आहे. तो सर्व लोकांचा राजा आहे, देवतांसारखा मधुर आहे.
भारताच्या कानाकोपऱ्याचे अधिदैवत बनलेल्या प्रभू श्रीरामांची महर्षि वाल्मिकींनी वर्णिलेली अवघी जीवनकथा, त्यांना भोगावा लागलेला वनवास, रावणासारख्या बलाढ्य शत्रूशी करावा लागलेला सामना, अंती मिळालेला विजय आणि अयोध्येत परतलेल्या सूर्यकुलातील ह्या युगपुरुषाचे लक्ष दीप उजळून झालेले स्वागत हे सगळे सगळे विलक्षण आहे. अद्भुत आहे.
‘आदौ राम तपोवनादि गमनं । हत्वा मृगं कांचनम् ॥
वैदेहीहरणं जटायुमरणं । सुग्रीव संभाषणम् ॥
बालीनिर्दलनं समुद्रतरणं । लंकापुरीदाहनम् ॥
पश्चाद् रावण कुम्भकर्ण हननम् । एतद्धि रामायणम्’
अशा अवघ्या एका श्लोकातही रामायण सांगितले जाऊ शकते किंवा कथा उपकथानकांच्या रसपूर्ण मालिकेतूनही रामकथा सांगितली जाऊ शकते. म्हणूनच तर तुलसीदासापासून समर्थ रामदासांपर्यंत सर्वांनी त्याचे मुक्तकंठाने संकीर्तन केले. त्याला मनात आणि मंदिरात स्थान दिले. महाराष्ट्रवाल्मिकी गदिमांनी तर आपल्या रसाळ शब्दांत गीतरामायण रचिले. श्रीरामाचे अयोध्यानगरीत आगमन होताच त्यांची लेखणी लिहून गेली, ‘पुलकित पृथ्वी, पुलकित वायू । आज अहल्येपरी जाहला नगरीचा उद्धार!’
श्रीरामांचे अयोध्येतील आगमन हे खरे तर प्रतिकात्मक आहे. गुलामगिरीच्या खुणा पुसून टाकून राष्ट्रीय स्वाभिमानाला उजाळा देण्यासाठी ही मंदिर उभारणी आहे. जे राष्ट्र आपला इतिहास विसरते, संस्कृती विसरते ते लयाला जाते. परंतु दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतरदेखील आपल्या गुलामगिरीच्या खुणा पुसून टाकण्याऐवजी त्या मिरवण्यातच आपण धन्यता मानली. मेकॉलेने मानगुटीवर बसवलेले केवळ पाश्चात्त्यांचा उदोउदो करण्यात धन्यता मानायला लावणाऱ्या आणि स्वतःचे राष्ट्र, राष्ट्रपुरुष, संस्कृती, अस्मिता ह्याप्रती न्यूनगंड बाळगायला भाग पाडणाऱ्या शिक्षणपद्धतीने आपल्या अनेक पिढ्या वाया घालवल्या. परंतु कालचक्र फिरत असते. जे चांगले आहे, ते काही काळ खाली गेलेले असले, तरी ते पुन्हा वर येत असते. तसे एक सांस्कृतिक जनजागरण गेली काही वर्षे देशामध्ये चालले आहे. संस्कृती आणि वारसा ही केवळ एखाद्या राजकीय पक्षाची वा संघटनेची मिरास नाही. प्रत्येक भारतीयाने अभिमानाने मिरवावा असे हे संचित आहे आणि तसे ते राजकारणविरहितपणे मिरवले गेले पाहिजे. आपल्या राष्ट्रीय सांस्कृतिक मूल्यांची जोपासना करण्याची प्रेरणा हे राममंदिर आणि त्यामध्ये विराजमान झालेला रामलला सर्वांना देईल अशी अपेक्षा आहे. दुर्दैवाने ह्या घटनेकडे केवळ राजकीय परिप्रेक्ष्याने आज पाहिले जाते आहे. खरे म्हणजे राजकारण, निवडणुका, मते, सत्ता हे सारे सारे क्षणभंगूर आहे. अशाश्वत आहे. चिरंतन आहे ते राष्ट्र आणि राष्ट्रीयत्व. धर्म, न्याय, सत्याधिष्ठित राष्ट्र असेल तरच खरा सर्वधर्मसमभाव प्रस्थापित होईल. समाजामध्ये खरी समता येईल. त्यादृष्टीने प्रभू श्रीराम आणि त्यांचे रामराज्य हा उच्चकोटीचा आदर्श आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींनी देखील सुशासनाचा मापदंड म्हणून रामराज्याकडे पाहिले होते. देशामध्ये हे रामराज्य पुनःप्रस्थापित करायचे असेल तर ते केवळ एक व्यक्ती आणू शकणार नाही. त्यासाठी श्रीरामांचा जयघोष केवळ ओठांतून न करता ह्रदयातून झाला पाहिजे. प्रत्येकामधील तो ह्रदयस्थ नारायण जागला, तर रामराज्य साकारायला उशीर तो काय?
रामस्य चरितं श्रुत्वा धारयेयुर्गुणांंजनाः ।
भविष्यति तदा हयेतत् सर्वं राममयं जगत् ॥
अर्थ ः प्रभू श्रीरामांचे चरित्र, त्यांची कथा ऐकून जेव्हा मनुष्य आपल्या जीवनात त्या गुणांना धारण करील, तेव्हा हा संसारच राममय होऊन जाईल.