तामिळनाडूच्या सहा वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या धुरंदर राजकारणी आणि एकेकाळच्या प्रख्यात चित्रपट अभिनेत्री जे. जयललिता (६८) यांचे काल रात्री ११.३० वाजता निधन झाल्याचे त्यांच्यावर उपचार करणार्या इस्पितळाच्या वतीने जाहीर करण्यात आले. रविवारी संध्याकाळी आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यानंतर त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. दरम्यान काल संध्याकाळी त्यांच्या प्रकृतीविषयी काही प्रसारमाध्यमांनी चुकीची माहिती दिल्याने राज्यातील स्थिती तणावपूर्ण बनली होती. त्यानंतर अपोलो इस्पितळाने जयललिता यांच्यावर लंडन येथील ह्रदयरोगतज्ज्ञ डॉ. रीचर्ड बेले यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू असून त्यांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे जाहीर केले. मात्र, त्यात यश आले नाही.
रविवारी संध्याकाळी जयललिता यांना अपोलो इस्पितळात उपचारांदरम्यान हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्याबाबतचे वृत्त पसरल्यानंतर त्यांच्या समर्थक, कायकर्त्यांनी इस्पितळाबाहेर प्रचंड गर्दी केली. यामुळे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना तातडीने तामिळनाडूला जाण्यास सांगितले. राज्यपाल राव यांनी त्यानुसार अपोलो इस्पितळात जाऊन त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती घेतली. यावेळी इस्पितळ परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला होता. राज्य पोलिसांना अती दक्षतेचाही इशारा देण्यात आला.
अफवांमुळे परिसरात तणाव
काल संध्याकाळी जयललिता यांच्या प्रकृतीविषयी अफवा पसरण्यास प्रारंभ झाल्याने इस्पितळ परिसरातील स्थिती तणावपूर्ण बनली. हिंसाचाराची चिन्हे दिसू लागली. संतप्त कार्यकर्त्यांनी पोलिसांनी लावलेले अडथळे हटवून इस्पितळात जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी या स्थितीवर नियंत्रण आणले.
पक्ष कार्यालयावरील झेंडा अर्ध्यावर आणल्याने तणाव
विशेष म्हणजे अशा वेळी अभाअद्रमुकच्या कार्यालयाबाहेरील झेंडा अर्ध्यावर आणला गेल्याने तणावात भर पडली. तथापि हा झेंडा पुन्हा वर घेण्यात आला. दरम्यान अभाअद्रमुकच्या आमदारांची या वातावरणातच संध्याकाळी बैठक झाली. राज्याच्या नव्या मुख्यमंत्री निवडीवर या बैठकीवर चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. ओ. पनीरसेल्वन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
जयललिता यांना गेल्या २२ सप्टेंबर रोजी चेन्नईतील अपोलो इस्पितळात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या मूत्रपिंड, यकृत, फुफ्फुसात संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले होते. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या निधनाने तामीळनाडूवर शोककळा पसरली असून रात्री उशिरापर्यंत अपोलो इस्पितळाबाहेर त्यांच्या चाहत्यांचा जनसागर उसळला होता.
जयललितांच्या निधनाची उशिरा अपोलो इस्पितळाकडून घोषणा
जयललिता यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. त्यांना केवळ आंतरराष्ट्रीय पातळीवर उपलब्ध असणारे ‘एक्स्ट्रा कॉर्पोरेअर मेंब्रेन ऑक्सिजनेशन’ किंवा एक्मो हे उपचार प्रदान करण्यात आले होते. मात्र त्यांचे प्राण वाचवण्यात यश आले नाही. रात्री ११.३० वाजता जयललिता यांचे प्राणोत्क्रमण झाले अशी माहिती अपोलो इस्पितळाने रात्री जारी केलेल्या निवेदनातून दिली. तत्पूर्वी संध्याकाळच्या निवेदनात त्यांच्या निधनासंबंधी पसरवण्यात आलेल्या बातम्या खोट्या असल्याचे त्यांनी म्हटले होते.