बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी दोषी सिद्ध : निवाड्यानंतर तामिळनाडूत हिंसाचार
अभाअद्रमुक पक्षाच्या सर्वेसर्वा असलेल्या ६६ वर्षीय जयललिता यांनी ६६.६५ कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जवळ बाळगल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध १८ वर्षांपूर्वी खटला दाखल झाला होता. १९९१ ते १९९६ या कालावधीत प्रथमच मुख्यमंत्री राहिल्या असतानाच्या काळात त्यांच्यावर हा खटला गुदरण्यात आला होता. त्यांच्यासह त्यांच्या जवळच्या मानल्या जाणार्या शशिकला, त्यांची पुतणी इलावरासी व त्यांचे मानसपुत्र सुधाकरन यांनाही न्यायालयाने या प्रकरणात दोषी ठरविले आहे. शिक्षेच्या चार वर्षांदरम्यान तसेच त्यानंतरच्या सहा वर्षांपर्यंत जयललिता यांना निवडणूक लढविण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.
विशेष न्यायालयाचे न्यायाधीश मायकल डिकुन्हा यांनी परप्पना अग्रहारा तुरुंग संकुलातील तात्पुरत्या न्यायालयात वरील निवाडा जाहीर केला. या निवाड्यामुळे जयललिता मुख्यमंत्रीपदावर असताना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली दोषी ठरलेल्या देशातील पहिल्या मुख्यमंत्री ठरल्या आहेत.
या निवाड्यामुळे अभाअद्रमुकच्या रॉयपेट्टा येथील मुख्यालयात सन्नाटा निर्माण झाला. या पक्षाच्या काही संतप्त समर्थकांनी द्रमुकच्या नेत्यांच्या प्रतिमा जाळल्या. तर द्रमुकच्या कार्यकर्त्यांनी या पक्षाचे सर्वेसर्वा करुणानिधी यांच्या निवासस्थानावर या निवाड्याचा आनंद साजरा केला.
या निवाड्याला आव्हान देण्याची जयललिता यांना संधी आहे. आव्हान दिल्यास त्या कालावधीत निवाडा सर्वसामान्यपणे निलंबित ठेवला जातो. मात्र क्वचितच न्यायालय अशा निवाड्याला स्थगिती देते. आव्हानानंतर न्यायालयाने वरील निवाडा निलंबित ठेवला व जयललिता यांना जामीन मिळाला तर उच्च न्यायालय अंतिम निवाडा देईपर्यंत त्यांना निवडणूक लढविणे अशक्य ठरू शकते असे विधीतज्ज्ञांचे मत आहे.
तामिळनाडूत हिंसाचार, जाळपोळ
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता दोषी असल्याचा निवाडा जाहीर झाल्यानंतर या राज्यातील विविध भागांमध्ये हिंसाचाराचा वणवा पसरला. जयललिता यांच्या अभाअद्रमुकच्या समर्थकांनी ठिकठिकाणी खाजगी तसेच सार्वजनिक मालमत्तेची नासधूस, जाळपोळ, दगडफेक तसेच बाजारपेठांमधील दुकाने जबरदस्तीने बंद केल्याचे वृत्त आहे. तिरुचिरापल्ली व दिंडी गुल येथे काही दुकानांमध्ये लुटालूट झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. कायदा व सुव्यवस्थेसाठी बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
चेन्नई व मदुराई या शहरांसह अन्य अनेक ठिकाणी जयललिता समर्थकांनी द्रमुकचे अध्यक्ष करुणानिधी तसेच त्यांचे पुत्र एम. के. स्टॅलिन व एम. के. अलगिरी यांच्या प्रतिमा जाळल्या व द्रमुक पक्षाचे पोस्टर्स फाडल्यामुळे या शहरांमध्ये तणाव निर्माण झाला होता.
निदर्शकांनी भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांच्या घरावर दगडफेक केली. गोपालपुरम येथे द्रमुक व अभाअद्रमुक यांच्या समर्थकांमध्ये चकमकी उडाल्याचेही वृत्त आहे.
वेप्पूर गावात निदर्शकांनी राज्य परिवहन मंडळाची एक बस जाळली. तर कुड्डलूर जिल्ह्यात २० बसगाड्यांचे नुकसान करण्यात आले. चेन्नईनजीकच्या अम्बत्तूर, सालेम, कुड्डलूर, इडापडी व श्रीरंगम या जिल्ह्यांमध्ये दगडफेकीच्या घटना घडल्या.
तब्बल १८ वर्षे चालू असलेल्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणातील खटल्यात अखेर येथील विशेष न्यायालयाने तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता दोषी असल्याचा निवाडा काल दिला. या निवाड्यामुळे जयललिता आमदार म्हणूनही अपात्र ठरल्या असून चार वर्षे तुरुंगवास व १०० कोटी रुपये दंड अशी शिक्षा या न्यायालयाने त्यांना ठोठावली आहे. या शिक्षेची अंमलबजावणी तातडीने व्हायची आहे. या प्रकरणातील अन्य आरोपींना प्रत्येकी चार वर्षे तुरुंगवास व १० कोटी रु. दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.