जम्मू-काश्मीर, हरियाणामध्ये सत्ता कोणाची? आज निकाल

0
3

जम्मू-काश्मीर आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल आज (दि. 8) जाहीर होणार आहे. मंगळवारी सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सर्वात आधी पोस्टल मतांची मोजणी करण्यात येईल. त्यानंतर ईव्हीएममधील मतमोजणी सुरू होईल. जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 हटविल्यानंतर प्रथमच निवडणुका पार पडत आहेत. एक्झिट पोल्समधून जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स व काँग्रेस युतीची सत्ता, तर हरयाणात काँग्रेस स्वबळावर सत्ता स्थापन करणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीरसह हरयाणाच्या निकालाकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यांत निवडणूका पार पडल्या होत्या. जम्मू-काश्मीर विधानसभेच्या 90 जागांसाठी 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर रोजी मतदान झाले होते. जम्मू आणि काश्मीरसाठी ही निवडणूक खूप महत्वाची आहे. कारण ऑगस्ट 2019 मध्ये कलम 370 हटविल्यानंतर राज्यात पहिल्यांदाच निवडणूक झाली आहे. कलम 370 हटविल्यानंतर तत्कालीन जम्मू आणि कश्मीर राज्यापासून लडाख आणि लेह यांना वेगळे करुन केंद्रशासित प्रदेशात त्याचे रुपांतर करण्यात आले आहे. जम्मू आणि काश्मीर येथे नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसने एकत्र निवडणूका लढविल्या आहेत, तर पीपल्स डेमोक्रेटिक पक्ष आणि भाजपने स्वतंत्र निवडणूक लढवली आहे.

हरियाणा विधानसभेच्या 90 जागांसाठी 5 ऑक्टोबरसाठी मतदान झाले होते. हरियाणात भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांच्यात मुख्य लढत होत आहे. तसेच नॅशनल लोक दल-बहुजन समाज पक्ष आणि जननायक जनता पक्ष, आझाद समाज पक्ष यांच्यात निवडणूक पूर्व आघाडी झालेली होती. या निवडणुकीत नक्की कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एक्झिट पोलच्या अंदाजानुसार हरियाणात भाजपला तिसऱ्यांदा सत्ता आणणे कठीण होणार आहे. त्यांची मोठी पीछेहाट होताना दिसत आहे. सध्याचा प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसला बहुमताच्या आकड्यापेक्षा जास्त जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
एक्झिट पोलच्या अंदाजानुसार नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस यांच्या युतीची सत्ता जम्मू-काश्मीरमध्ये येणार आहे. त्यांना 45 ते 50 च्या दरम्यान जागा मिळतील असा अंदाज आहे. भाजपला 30 पेक्षा जागा जिंकणे कठीण होणार आहे, असाही अंदाज आहे.

निकालानंतर 5 आमदारांचे नामांकन

8 ऑक्टोबर रोजी जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर लगेचच 5 आमदारांचे नामांकन केले जाईल. गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार, जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा विधानसभेसाठी 5 लोकांना नामनिर्देशित करतील. अशा स्थितीत एकूण आमदारांची संख्या 95 होईल आणि बहुमताचा आकडा 48 वर जाईल.

वास्तविक, 370 हटवल्यानंतर, एलजी जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना कायदा 2019 अंतर्गत विधानसभेत 5 आमदारांना नामनिर्देशित करू शकतात. हा नियम महिला, काश्मिरी पंडित आणि पीओकेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आणण्यात आला होता. जुलै 2023 मध्ये यात सुधारणा करण्यात आली.
या नामनिर्देशित आमदारांना विधानसभेतील मतदानाच्या अधिकारासोबतच विधानसभेचे सर्व अधिकार आणि विशेषाधिकार मिळतील.