>> हरियाणामध्ये एका, तर जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यांत निवडणूक; 4 ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार
केंद्रीय निवडणूक आयोगाने काल जम्मू-काश्मीर आणि हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. हरियाणामध्ये एका, तर जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यात निवडणूक होणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर, तर हरियाणामध्ये 1 ऑक्टोबरला एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. 4 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होऊन दोन्ही राज्यांच्या विधानसभांचा निकाल जाहीर होणार आहे. 5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. हरियाणा विधानसभेचा कार्यकाळ 3 नोव्हेंबर रोजी संपणार आहे.
कलम 370 बाबत गेल्या वर्षी निकाल देतानाच सर्वोच्च न्यायालयाने जम्मू-काश्मीर विधानसभेच्या निवडणुका 30 सप्टेंबर 2024 अगोदर घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, केंद्रीय निवडणूक आयोगाने काल जम्मू काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. मुख्य निवडणूक आयुक्तांनी प्रदेशाचा दौरा करुन विधानसभा निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेतला होता. त्यानंतर ही निवडणूक जाहीर करण्यात आली.
जम्मू-काश्मीरमध्ये मतदार किती?
90 पैकी 74 जागा सर्वसाधारण, 9 अनुसूचित जाती उमेदवार आणि 7 अनुसूचित जमातीसाठी आहेत. आता जम्मू-काश्मीरातील मतदारांची संख्या 87.09 लाख आहे, त्यापैकी 44.46 लाख पुरुष आणि 42.62 लाख महिला आहेत. दरम्यान, 20 ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.
दोन दशकांमधील
सर्वांत लहान निवडणूक
जम्मू काश्मीरच्या निवडणुकीचा टप्पा महत्त्वाचा आहे, कारण गेल्या दोन दशकांमध्ये केंद्रशासित प्रदेशाच्या सुरक्षेच्या कारणास्तव, किमान चार किंवा त्याहून अधिक टप्प्यांमध्ये सातत्याने निवडणुका झाल्या आहेत. 2002 मध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये चार टप्प्यांत मतदान घेण्यात आले होते. 2008 मध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये सात टप्प्यांत निवडणुका झाल्या होत्या, तर 2014 मध्ये पाच टप्प्यांत घेण्यात आले.
1787 अतिरेक्यांना कंठस्नान;
अन् 984 निष्पाप जीवांचा बळी
2014 सालापासून जम्मू काश्मीर प्रदेशात झालेले अतिरेकी हल्ले आणि जीवितहानीची आकडेवारी उपलब्ध आहे. 371 नागरिक आणि 613 सुरक्षासैनिकांचा गेलेला बळी काश्मीर खोऱ्यातील भयाण वास्तव समोर आणणारी ही आकडेवारी आहे. 1787 अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यासाठी 984 निष्पाप जीवांचा बळी जाणे निश्चितच दुर्दैवी म्हणावे लागेल. प्रत्येक दोन अतिरेक्यांच्या मागे एका निष्पापाच्या बळी जाण्याचे हे प्रमाण धक्कादायक आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये एकूण 90 जागा
जम्मू आणि काश्मीर हा विधानसभा असलेला केंद्रशासित प्रदेश आहे. पूर्ण राज्याचा दर्जा रद्द केल्यानंतर तेथील विधानसभेचे चित्रही बदलले आहे. आता जम्मू-काश्मीरमध्ये 114 जागा आहेत, त्यापैकी 24 जागा पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) येतात. आता केवळ 90 जागांवर निवडणूक होणार आहे. 90 पैकी 43 जागा काश्मीर विभागात, तर 47 जागा जम्मू विभागात आहेत.
हरियाणाच्या 90 जागांसाठी मतदान
हरियाणात एकूण 90 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी 73 जागा सर्वसाधारण, तर 17 जागा अनुसूचित जातींसाठी आहेत. हरियाणात एकूण 2.01 कोटी मतदार आहेत. त्यापैकी 1.06 कोटी पुरुष, 95 लाख महिला, 4.52 लाख नवीन मतदार आणि 40.95 लाख युवा मतदार आहेत. हरियाणाची अंतिम मतदार यादी 27 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होईल.