जम्मू काश्मीर, झारखंडमध्ये आज मतदानाचा पहिला टप्पा

0
177

नक्षलवाद, दहशतवादामुळे चोख सुरक्षा
झारखंड व जम्मू काश्मीर या राज्यांत आज विधानसभेसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे. झारखंडमध्ये माओवाद्यांकडून संभावित हल्ले व जम्मू काश्मीरात दहशतदवादी संघटनांकडून झालेल्या बहिष्काराच्या आवाहनामुळे दोन्ही ठिकाणच्या मतदानाला संवेदनशील स्वरूप प्राप्त झाले आहे.जम्मू काश्मीरमधील १५ मतदारसंघांत तर झारखंडमध्ये १३ मतदारसंघांत निवडणूका होत आहेत.
जम्मू काश्मीरात बहुरंगी लढत होत असून सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्स, विरोधी पक्ष पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी, तसेच भाजप व कॉंग्रेस आमने-सामने आहेत. झारखंडमध्ये मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील झारखंड मुक्ती मोर्चाची प्रमुख लढत भाजपशी आहे.
दरम्यान, झारखंडमध्ये नक्षलवादी राष्ट्रीय जनता दल (राजद) आणि झारखंड विकास मोर्चा (जेव्हीएम) च्या नेत्यांवर हल्ल्याची योजना आखत असल्याच्या गुप्तचर खात्याच्या माहितीनंतर सुरक्षा व्यवस्था अधिक चोख करण्यात आली आहे. दरम्यान, पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना – हिजबुल मुजाहिदीन व जैश ए मुहम्मद – जम्मू काश्मीरमधील आपल्या स्थानिक कमांडरना वापरून लोकांना निवडणुकांवर बहिष्कारासाठी धमकावत असल्याची माहितीही गुप्तचर खात्याला मिळाली आहे. दरम्यान, फुटीतावादी संघटना असलेल्या हुरीयत कॉन्फरन्स व जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटनेही आज निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करताना बंदही पुकारला आहे.