जम्मू-काश्मीरमध्ये 5 जवान शहीद

0
7

>> कठुआ जिल्ह्यात लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; 6 जवान जखमी

जम्मू-काश्मीरमध्ये काल लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 5 जवान शहीद झाले असून, 6 जवान जखमी झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे रात्री उशिरापर्यंत लष्कराचे जवान आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरू असल्याची माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, कठुआ जिल्ह्यातील मच्छेडी भागात हा हल्ला झाला. लष्कराचे पथक या भागातून जात असताना एका टेकडीवर लपलेल्या दहशतवाद्यांनी अचानक लष्कराच्या ताफ्यावर गोळीबार सुरू केला. तसेच हातगोळेही फेकले.

या हल्ल्याला भारतीय लष्करानेही चोख प्रत्युत्तर दिले; मात्र या चकमकीत पाच जवान शहीद झाले, तर सहा जवान जखमी झाले. जखमी जवानांना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात मोठी वाढ झाली आहे. रविवारी राजौरी भागातही दहशतवाद्यांनी लष्कराच्या ताफ्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यालाही लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले होते; मात्र दशहतवाही येथून पळून जाण्यात यशस्वी ठरले होते. या हल्ल्यात एक जवान जखमी झाला होता.