जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच विधानसभा निवडणूक होणार

0
16

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतदारयाद्या अद्ययावत करण्याची सूचना

लवकरच जम्मू-काश्मीर, महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. या राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी आयोगाकडून मतदारयाद्या अद्ययावत करण्यासंदर्भात सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या राज्यांत विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने 20 ऑगस्टपर्यंत मतदारयाद्या अद्ययावत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

जम्मू-काश्मीरमध्ये 2018 पासून विधानसभा अस्तित्वात नाही. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला जम्मू-काश्मीरमधील विधानसभेच्या निवडणुका सप्टेंबरपर्यंत घेण्यात याव्यात, असा आदेश देण्यात आला होता. त्यामुळे निवडणूक आयोग आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. जम्मू-काश्मीरबरोबरच महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड या राज्यांच्याही निवडणुकांच्या तारखा निवडणूक आयोग जाहीर करण्याची शक्यता आहे.
कारण हरियाणा विधानसभेचा कार्यकाळ 3 नोव्हेंबर रोजी संपत आहे. तसेच झारखंड विधानसभेचा कार्यकाळ 5 जानेवारी 2025 रोजी आणि महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबरला संपत आहे. त्यामुळे या राज्यांतही निवडणूक आयोगाला घ्याव्या लागणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर या चारही राज्यांतील निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरू करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने जम्मू आणि काश्मीरसह महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना गुरुवारी एक पत्र लिहिले आहे. या पत्राच्या माध्यमातून संभाव्य तारखा देण्याची मागणी करण्यात आली आहे.