जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा

0
4

जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यातील गंडोह भागात सुरक्षा दलांनी काल बुधवारी (26 जून) तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. सकाळी या भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि लष्कराकडून शोधमोहीम सुरू होती, त्यानंतर चकमक सुरू झाली.

काश्मीर खोऱ्यात वाढत्या दहशतवादी घटनांवर सर्व सुरक्षा दलांकडून संयुक्त कारवाई सुरू आहे. दहशतवाद्यांना शोधून त्यांचे अड्डे उध्वस्त करण्याच्या कामात सुरक्षा दलांना गेल्या काही दिवसात चांगले यश येत आहे. याच कारवाई दरम्यान बुधवारी डोडा येथे सुरक्षादलांनी तेीन दहशतवाद्यांना ठार केले.
जम्मू-काश्मीरमधील पोलीस उच्चाधिकाऱ्यांनी या समाजमाध्यमावर याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार जम्मू-काश्मीरमधील डोडा येथील गंडोह भागात बजाड या यावी सुरक्षा दलांच्या शोधमोहीमेदरम्यान सकाळी 9 वाजून 50 मिनिटांनी दहशतवाद्यांसोबत चकमक झाली.

यावेळी दोन्ही बाजूकडून झालेल्या गोळीबारामध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश आले. ही मोहीम जम्मू-काश्मीर पोलीस, सीआरपीएफ यांनी संयुक्तपणे राबविली होती. यावेळी दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा देखील हस्तगत करण्यात आला आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, 11 आणि 12 जून रोजी डोडामध्ये दुहेरी दहशतवादी हल्ला झाला होता. तेव्हापासून लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलीस सखोल शोध मोहीम राबवत आहेत. दरम्यान, ढोकमधून (मातीचे घर) दहशतवाद्यांनी टीमवर गोळीबार केला. एका दहशतवाद्याने घरातून बाहेर येऊन हल्ला केला. त्यानंतर या चकमकीला सुरूवात झाली होती.