जम्मू-काश्मीरमध्ये उभारणार छत्रपती शिवरायांचा पुतळा

0
9

>> केंद्रीय संरक्षणमंत्र्यांहस्ते 7 रोजी अनावरण

सीमेवर सदैव देशाचे संरक्षण करत असलेल्या लष्करी जवानांना प्रोत्साहन देण्यासाठी आता जम्मू काश्मीरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार आहे.
जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे हा पुतळा उभारण्यात येणार असून केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या पुतळ्याचे येत्या 7 नोव्हेंबर रोजी अनावरण करण्यात येणार आहे. हा पुतळा येत्या 25 ऑक्टोबरपर्यंत कुपवाडा येथे पोहोचणार आहे.

तत्पूर्वी आज दि. 23 रोजी दिल्ली येथे एका कार्यक्रमात तो प्रदर्शित केला जाणार आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी हा पुतळा काश्मीरला पाठवला होता.
या पुतळ्याचे अनावरण करण्यापूर्वी त्याची पूजा केली जाणार असून त्यासाठी भूमिपूजनासाठी शिवरायांच्या विविध किल्ल्यांवरून माती आणि पाणी आणण्यात आली आहे.

कुपवाडा येथे पुतळा बसवण्यासाठी आम्ही पुणेकर या स्वयंसेवी संस्थेने छत्रपती शिवाजी महाराज अटकेपार स्मारक समितीसोबत पुढाकार घेतला असून त्याची फेब्रुवारीपासून तयारी सुरू करण्यात आली होती.
जानेवारी 2022 मध्ये नियंत्रण रेषेवर मराठा रेजिमेंटने छत्रपती शिवाजी महाराजांचे दोन पुतळे बसवले होते. यापैकी एक पुतळा समुद्रसपाटीपासून 14800 फूट उंचीवर एलओसीजवळ बसवण्यात आला आहे. काश्मीरमधील दहशतवादविरोधी कारवायांमध्ये आणि नियंत्रण रेषेवरील घुसखोरांविरुद्ध महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या लष्कराच्या 41 आरआरची स्थापना प्रामुख्याने मराठा रेजिमेंटच्या सैनिकांमधूनच करण्यात आली आहे.

दरम्यान, घोड्यावर स्वार झालेल्या स्वरूपात असलेला हा पुतळा फायबरपासून बनवलेला आहे. विशेष प्रकारची रसायने आणि फायबर मिसळून तो तयार करण्यात आला आहे. तो कोणत्याही हवामानात टिकून राहू शकतो व पुढील 25 वर्षे त्याला काहीही होणार नसल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
ज्या प्लॅटफॉर्मवर मूर्तीची प्रतिष्ठापना करायची आहे तो प्लॅटफॉर्म तयार करण्यात असून पुतळा बसवल्यानंतर स्टेज ग्रॅनाइटने सजवण्यात येणार आहे.