>> तिघेही जैश-ए-मोहम्मदशी संबंधित; तीन दिवसांत 6 अतिरेकी ठार
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आता जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधातील मोहीम तीव्र करण्यात आली आहे. भारतीय सुरक्षा दलाकडून दहशतवाद्यांना वेचून वेचून ठार केले जात आहे. मंगळवारी लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना यमसदनी धाडल्यानंतर काल सकाळी पुलवामामध्ये झालेल्या चकमकीत आणखी तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. हे तीन दहशतवादी जैश-ए-मोहम्मदशी संबंधित होते.
जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामाध्ये नादेर, त्राल येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये गुरुवारी चकमक झाली. दहशतवाद्यांबद्दल गुप्तचरांकडून माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई सुरू करण्यात आली होती. यावेळी दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील त्राल येथील नादेर गावाला सैन्याच्या संयुक्त पथकाने वेढा घातला. सुरक्षा दलाच्या पथकाकडून कारवाई केली जात असताना लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर बेछूट गोळीबार केला. या हल्ल्याला सुरक्षा दलांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. त्यात जैश-ए-मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले.
त्रालच्या नादेर भागात मारले गेलेले हे तीन दहशतवादी जैश-ए-मोहम्मदशी संबंधित होते. त्रालमधील चकमकीत आसिफ अहमद शेख, आमिर नझीर वाणी आणि यावर अहमद भट या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. दहशतवादी आसिफ शेख आहे. तो जैश-ए-मोहम्मदचा कमांडर होता.
दरम्यान, या आठवड्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेली ही दुसरी चकमक आहे. गेल्या तीन दिवसांत सुरक्षा दलांनी अशा प्रकारे 6 दहशतवाद्यांना ठार मारले आहे. दोन दिवसांपूर्वी शोपियानमध्ये सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांना ठार मारले होते.
यादीतील 6 दहशतवादी ठार; 8 जणांचा शोध सुरू
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने 14 दहशतवाद्यांची एक यादी जाहीर केली होती. गेल्या तीन दिवसांत या यादीतील सहा दशतवाद्यांना भारतीय सैन्याने कंठस्नान घातले, तर उरलेल्या 8 जणांचा शोध सुरू आहे. तीन दिवसांपूर्वी ऑपरेशन केलरमध्ये तीन दहशतवादी ठार झाले होते, तर गुरुवारी राबवलेल्या ऑपरेशन नादरमध्ये आणखी तीन दहशतवादी मारले गेले.