जम्मू-काश्मीरमधील पूरस्थिती गंभीरच : बळींची संख्या १३८

0
253
प्रलयंकारी महापूरामुळे श्रीनगर शहर असे जलमय बनले आहे.

पंतप्रधानांकडून एक हजार कोटींची मदत जाहीर
जम्मू-काश्मीरला प्रलयंकारी महापुराच्या विळख्याने अजूनही वेढलेलेच असून तेथील स्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नाही. कालच्या दिवसापर्यंत या महापुराने घेतलेल्या बळींची संख्या १३८ वर पोचली असून १२ हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. मृतांपैकी जम्मूतील १२७ तर काश्मीर खोर्‍यातील ११ जण असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, जम्मू -काश्मीरमधील पूरस्थिती ही राष्ट्रीय आपत्ती असल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले असून पूरग्रस्तांसाठी एक हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.
महापुराने श्रीनगरमधले लष्करी मुख्यालय, सचिवालय तसेच उच्च न्यायालय अशा महत्वाच्या ठिकाणांनाही वेढा घातला आहे. लष्कर तसेच हवाई दलाच्या जवानांनी जम्मूच्या विविध भागांमधील सुमारे १२ हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले असल्याची माहिती प्रशासकीय अधिकार्‍यांनी दिली. प्रत्येकी ७५ ते १०० जवानांच्या १८४ तुकड्या सध्या या आपत्कालीन मोहिमेखाली तैनात करण्यात आले आहे. तसेच २३ हेलिकॉप्टर्स व हवाई दलाची विमानेही त्यांच्या दिमतीला देण्यात आली आहे. दरम्यान, जम्मू भागातील परिस्थितीचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांच्या एका बैठकीत घेतला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री ओमर अब्दुला हेही उपस्थित होते. गेल्या ५० वर्षातील हे सर्वात भीषण असे संकट असल्याचे मुख्यमंत्री अब्दुला यांनी म्हटले असून नागरिकांनी धीर सोडू नये असे आवाहन त्यांनी केले. ज्या भागांमध्ये लोक अडकून पडले आहेत तेथे प्रशासकीय यंत्रणांची मदत नक्कीच पोचवली जाईल, त्यादृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न जारी असल्याचे त्यांनी सांगितले. जम्मूतील पाण्याची पातळी कमी होत असल्याचेही ते म्हणाले. पंतप्रधानांबरोबरील बैठकीवेळी अब्दुल्ला यांनी पूरग्रस्त भागांमधील मदतकार्यात वाढ करण्याची मागणी केली. दरम्यान, जम्मू प्रांताचे विभागीय आयुक्त शांत मनू यांनी आतापर्यंत जम्मूत महापुराने १२७ जणांचे बळी घेतल्याची माहिती दिली.