>> बैठकीत गृहमंत्री अमित शहा यांनी दिले सुरक्षा अधिकाऱ्यांना निर्देश
जम्मू-काश्मीरबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली काल रविवारी दि. 16 रोजी एक उच्चस्तरीय सुरक्षा बैठक पार पडली. या बैठकीत अमरनाथ यात्रेची सुरक्षा आणि अलीकडील दहशतवादी हल्ल्यांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी गृहमंत्री अमित शहा यांनी, सुरक्षा अधिकाऱ्यांना जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद आणि त्याला समर्थन देणाऱ्यांना ठेचून काढा असे निर्देश बैठकीत दिले. 21 जून रोजी योग दिनाच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी 20 जून रोजी श्रीनगरला जाणार आहेत. त्यासाठी ही बैठक महत्त्वाची होती. या बैठकीत दि. 29 जूनपासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेच्या तयारीचाही आढावा घेतला. यापूर्वी 14 जून रोजीही शहा यांनी सुरक्षेबाबत बैठक घेतली होती.
काल झालेल्या बैठकीत शहा यांनी, यापुढे कोणत्याही परिस्थितीत आणि किमतीवर दहशतवाद वाढणार नाही, याची खबरदारी घेण्यास सांगितले आहे. दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला, आयबीचे संचालक तपन डेका, सीआरपीएफचे डीजी अनिश दयाल सिंह, जम्मू-काश्मीरचे एलजी मनोज सिन्हा, मुख्य सचिव अटल दुल्लू, डीजीपी आरआर स्वेन, एडीजीपी विजय कुमार, जम्मू-काश्मीरचे वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि गुप्तचर अधिकारी सहभागी झाले होते.
या बैठकीत गृहमंत्री शहा यांनी, अमरनाथ यात्रेसाठी संपूर्ण सुरक्षा कवच, यात्रा मार्गांवर विशेष सुरक्षा व्यवस्था, महामार्गांवर अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करणे, सर्व तीर्थक्षेत्रांवर दक्षता वाढविणे आणि जम्मू-काश्मीरमधील पर्यटन स्थळांची सुरक्षा वाढवण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
मोदींनीही घेतली बैठक
पंतप्रधान मोदी यांनी 13 जून रोजी जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी घटनांबाबत बैठक घेतली होती. त्यात एनएसए अजित डोवाल यांच्यासह सुरक्षा यंत्रणांचे अनेक अधिकारीही सहभागी झाले होते. सुरक्षा दलांच्या तैनातीबाबत पंतप्रधानांनी जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि गृहमंत्री शहा यांच्याशीही चर्चा केली होती.
अमरनाथ यात्रेसाठी 500 कंपन्या
अमरनाथ यात्रा 29 जूनपासून सुरू होत आहे. यावेळी अमरनाथ यात्रा 52 दिवसांची असेल. यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा वाढवण्यासाठी केंद्राने केंद्रीय सुरक्षा दलाच्या 500 कंपन्या खोऱ्यात तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. मार्गावर सीआरपीएफ, बीएसएफ, आयटीबीपी आणि सीआयएसएफसह केंद्रीय सशस्त्र सुरक्षा दलाच्या 500 कंपन्या तैनात आहेत.