जम्मूमध्ये भारतीय लष्कराची ‘ऑपरेशन ऑलआऊट’ मोहीम

0
17

जैशच्या 15 सदस्यांची धरपकड

भारतीय लष्कराकडून जम्मू क्षेत्रात दहशतवादाच्या उच्चाटनासाठी गेल्या दहा दिवसांपासून ऑपरेशन ऑलआऊट मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेत दहशतवादी संघटना जैश-ए-मोहंमदचा कणा मोडण्याचे काम लष्कर करत आहे. या संघटनेच्या स्थानिक नेटवर्कमधील 15 सदस्यांची धरपकड करण्यात आली आहे. या सक्रिय सदस्यांचा सुगावा स्थानिक 300 हून जास्त जणांच्या चौकशीनंतर मिळू शकला. या अटकेनंतरच सैन्याला कठुआ व डोडा येथील जवानांवर झालेल्या हल्ल्यातील दहशतवाद्यांचे रेखाचित्र जाहीर करता आले. या मोहिमेत सुमारे 7 हजार जवान तसेच 500 हून जास्त कमांडो यांच्यासह 170 चौरस किलोमीटर जंगल भागात कसून तपास करण्यात येत आहे. लष्कराने आतापर्यंत 500 नैसर्गिक गुहा शोधून काढल्या आहेत. या गुहांमध्ये दहशतवादी दडून बसत होते. जंगलात सीमेजवळ काही भागातील मार्गावरून दहशतवादी सर्रासपणे फिरत होते. याविषयीची माहिती मिळाल्यानंतर लष्कराने जोरदार तपास मोहीम हाती घेऊन धरपकड सुरू केली आहे.

5 लाखांचे बक्षीस

स्थानिक पोलिसांनी स्थानिकांसाठी काही बक्षीस जाहीर केले होते. दहशतवादी तसेच त्यांच्या साथीदारांची माहिती देणाऱ्यास पोलिसांकडून 5 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल, असे पोलिसांनी जाहीर केले होते. त्यामुळे नागरिक दहशतवाद्यांविषयी माहिती देण्यासाठी पुढाकार घेत आहेत.

बीएसएफचे जवान पाचारण

जम्मू ऑपरेशनमध्ये जास्तीत जास्त जवानांची तैनाती केली जाणार आहे. त्यामुळे सरकारने ओडिशात तैनात सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) दोन बटालियन म्हणजे 2 हजार जवान जम्मूला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांना पाकजवळील सांबा किंवा जम्मू-पंजाब सीमेवर सेकंड लाइनच्या रुपात तैनात केले जाणार आहे. बीएसएफ जम्मू, पंजाब, राजस्थान, गुजरातमध्ये 2289 किमी लांब आंतरराष्ट्रीय सीमेची निगराणी करते.

सर्वात मोठी तपासणी मोहीम

लष्करी सूत्रानुसार जम्मू क्षेत्रात राबवण्यात येणारी ही आजवरची ही सर्वात मोठी तपास मोहीम आहे. त्यामुळे स्वत: पंतप्रधान कार्यालयाकडून या घडामोडींवर थेट निगराणी केली जात आहे. मोहिमेचा प्रत्येक अहवाल राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराला दिला जात आहे. ताज्या हल्ल्यातून पहिल्यांदाच पाकिस्तानची बॅट टीम दिसून आली आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत सुरक्षेची व्यवस्था वाढवली जाईल.