जम्मूत चकमकीत १० मृत्युमुखी

0
77

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जम्मू काश्मीर भेटीच्या एक दिवस अगोदर काल, लष्कराच्या दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत चार नागरिकांसह १० जणांना मृत्यू झाला. अर्निया सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सिमेतून शस्त्रसज्ज दहशतवाद्यांनी घुसण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ही चकमक घडली.
अन्य मृतांमध्ये २ भारतीय जवान व चार दहशतवाद्यांचा समावेश आहे. या घुसखोरीस पाकिस्तानी रेंजर्सची फूस होती. घुसखोरीच्या वेळीत लक्ष विचलित करण्याकरिता पाकिस्तानच्या बाजूने रॉकेटचा मारा करण्यात आला. पोलीस अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, सात ते आठ दहशतवाद्यांचा एक गट अर्निया सेक्टरमध्ये भारतीय हद्दीत घुसला व त्यांनी एका नागरी वाहनावर गोळीबार केला. यात वाहनचालक व अन्य दोघे मारले गेले. त्यानंतर हे दहशतवादी रिकामी पडलेल्या बंकरमध्ये घुसले.
यावेळी लष्कर व सीमा सुरक्षा दलाशी दहशतवाद्यांची चकमक झाली. यात चार दहशतवादी मारले गेले. लष्कराचा एक कनिष्ठ अधिकारीही शहीद झाला तर चार जवान जखमी झाले. त्यानंतर काही काळ गोळीबार थांबला. मात्र अचानक वाचलेल्या दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एक नागरिक आणि सैनिक मारला गेला.
दरम्यान, पंतप्रधान मोदी आज ठरल्यानुसार पूंछ व उधमपूर येथे प्रचारसभा घेणार असल्याचे सांगण्यात आले.