जमीन घोटाळ्यातील फरार आरोपी अटकेत

0
4

गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने जमीन घोटाळा प्रकरणातील फरार संशयित आरोपी सिद्दिकी ऊर्फ सुलेमान खान याला काल अटक केली. म्हापसा येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने त्याला 9 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. सिद्दिकी खान हा एकतानगर म्हापसा येथील जमीन हडप प्रकरणामध्ये गुंतलेला आहे. संशयित आरोपीने जमीन हडप करून त्यात बांधलेली बांधकामे काही महिन्यापूर्वी मोडून टाकण्यात आली आहेत. राज्यातील अनेक जमीन घोटाळा प्रकरणांमध्ये संशयित सिद्दिकी गुंतलेला आहे. त्याला 5 वर्षांपूर्वी अटक करण्यात आली होती. जामिनावर सुटल्यानंतर तो फरारी झाला होता. अटक टाळण्यासाठी त्याने आपला पेहराव, वाहन, मोबाईल फोन, सिम कार्ड, लोकेशन अनेकदा बदलले. पोलिसांच्या रडारवर येऊ नये म्हणून त्याने कर्नाटकातील विविध शहरांमध्ये वास्तव्य केले. गेल्या 3 महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर पोलिसांनी त्याला अटक करण्यात यश मिळवले, अशी माहिती गुन्हा विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली.