जमीन घोटाळ्याच्या 2 प्रकरणांत सिद्दिकीविरुद्ध आरोपपत्र दाखल

0
1

गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाच्या खास तपास पथकाने (एसआयटी) जमीन बळकाव प्रकरणातील एक मुख्य संशयित आरोपी सिद्दिकी ऊर्फ सुलेमान खान याच्याविरोधात जमीन घोटाळ्याच्या 2 वेगवेगळ्या प्रकरणांत म्हापसा आणि वाळपई येथील प्रथम श्रेणी न्यायालयात आरोपपत्रे दाखल केली आहेत.
म्हापशातील जमीन घोटाळ्याच्या प्रकरणात म्हापसा नगरपालिका क्षेत्रातील एका जमिनीची बनावट कागदपत्रे आणि बार्देश उपनिबंधकाचा खोटा शिक्का वापरल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रकरणामध्ये 852 पानांचे आरोपपत्र म्हापसा येथील प्रथम श्रेणी न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. उपनिरीक्षक प्रीतेश मडगावकर यांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपपत्र दाखल केले.

दुसऱ्या एका प्रकरणात तिसवाडी तालुक्यातील गौळी मौळा येथील जमिनीचे बनावट कागदपत्र तयार करून वाळपई येथील उपनिबंधक कार्यालयाचा बनावट शिक्का वापरल्याचा आरोप संशयित सिद्दिकी खान याच्यावर ठेवण्यात आला आहे. त्या प्रकरणात त्याच्याविरोधात 656 पानांचे आरोपपत्र वाळपई येथील प्रथम श्रेणी न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक नितीन हळर्णकर यांनी केला.