जमीन घोटाळ्याची माहिती द्या

0
16

>> प्रकरणातील संशयितांसह संबंधित नागरिकांना आवाहन

राज्यातील जमीन घोटाळा प्रकरणी एक सदस्यीय चौकशी आयोगाने या प्रकरणातील संशयित आणि नागरिकांना स्वत:हून पुढे येऊन या घोटाळ्याची माहिती देण्यास बजावले आहे. 1 मार्चपर्यंत आपल्यासमोर येऊन यासंबंधीची माहिती द्यावी, असे आवाहन आयोगाने केले आहे.
उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश व्ही. के. जाधव हे या जमीन घोटाळ्याचे तपासकाम करीत असून, त्यांनी काल काढलेल्या एका जाहीर नोटीसीद्वारे गोव्यात झालेल्या 44 जमीन घोटाळा प्रकरणांचे तपशील दिले आहेत. त्यात जमिनीचे सर्व्हे क्रमांक, आरोपींची नावे, एफआयआरसंबंधीचे तपशील आदी माहिती दिली आहे.

खोटी कागदपत्रे तयार करुन ज्या जमिनी हडप करण्यात आलेल्या आहेत त्या प्रकरणी ज्या ज्या लोकांचा संबंध आहे अथवा ज्यांना त्या संबंधीची माहिती आहे अथवा ज्यांच्या या प्रकरणातील एफआयआरशी संबंध आहे अशांनी तसेच ज्यांना या जमिनीच्या बेकायदेशीररित्या केलेल्या हस्तातरणासंबंधीची माहिती आहे अशा सर्वांनी आयोगासमोर माहिती देण्यास पुढे यावे, अशी सूचना जाधव यांनी आपल्या जाहीर नोटीसीद्वारे केली आहे.

त्याचबरोबर या जमीन घोटाळा प्रकरणातील जे जे आरोपी आहेत त्यांनी या घोटाळ्यातील आपली कथित भूमिका व सहभाग याची आयोगाला माहिती द्यावी. यासंबंधीचे निवेदन देताना ते प्रतिज्ञापत्राद्वारे देण्याची सूचना या घोटाळ्यातील आरोपींना करण्यात आली आहे. आयोगाच्या कार्यालयात ही प्रतिज्ञापत्रे 1 मार्चपर्यंत सादर करण्यात यावीत, अशी सूचना केली आहे.