येथील जमिया मिलिया विद्यापीठाबाहेर सीएए विरोधी मोर्चेकर्यांवर गुरुवारी पिस्तुलाने गोळीबार केलेल्या ‘त्या’ कथित अल्पवयीनाला काल न्यायालयाने १४ दिवसांची प्रोटेक्टिव्ह कोठडी सुनावली. अल्पवयींनासाठी असलेल्या ज्युवेनाईल जस्टिस बोर्डने वरील आदेश दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपीला काल दु. १२ वा. वरील बोर्डसमोर उभे करण्यात आले अशी माहिती दिल्लीचे पोलीस उपायुक्त (क्राईम) राजेश देव यांनी सांगितले. आरोपीच्या वयाची निश्चिती करण्यासाठी बोन ऑसिफिकेशन चाचणी करण्यासंदर्भात वैद्यकीय पॅनल स्थापण्याची विनंती वरील बोर्डाला केल्याचे देव यांनी सांगितले.
दरम्यान, आरोपीने गुरुवारी जमिया विद्यापीठाचा विद्यार्थी शदाब फारूकी याच्या हातावर गोळी झाडल्याने त्याला इस्पितळात दाखल करून शस्त्रक्रिया करून त्याच्या हातातील गोळी काढण्यात आली. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
शूटरला पैसे कोणी दिले? ः राहुल
संसदीय अधिवेशनासाठी लोकसभेत प्रवेश करण्याआधी काल कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना पत्रकारांना जमिया गोळीबार प्रकरणी प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी ‘जामिया शूटरला’ पैसे कोणी दिले असा सवाल केला. दरम्यान, प्रियांका गांधी यांनीही याप्रकरणी भाजपवर टीका केली. भाजपचे नेते प्रक्षोभक वक्तव्ये करून हिंसाचारासाठी चिथावणी देतात असा आरोप त्यांनी केला. जेव्हा भारत सरकारमधील भाजपचे मंत्रीच गोळीबार करण्यासाठी चिथावणी देतात तेव्हा अशा गोष्टी घडणारच असे त्यांनी जमिया गोळीबारप्रकरणी म्हटले आहे.