उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यात सोमवारी सकाळी मालमत्तेच्या वादातून दोन कुटुंबातील सहा जणांची निर्घृण हत्या करण्यात आली. रुद्रपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फतेहपूर गावात हा रक्तंजित संहार घडला. या घटनेनंतर परिसरात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी जिल्हा पंचायत सदस्य प्रेम यादव यांचा सत्यप्रकाश दुबे यांच्यासोबत मालमत्तेवरून वाद होता. दोघेही एकाच परिसरात राहत होते. सकाळी 9 च्या सुमारास प्रेम यादव हे सत्यप्रकाश यांच्या घरी आले. त्यांच्यात सुरुवातीला वाद झाला. वादाचे रुपांतर मारहाणीत झाले. या मारहाणीत प्रेम यादव यांची हत्या झाली. प्रेम यादव यांच्या हत्येची माहिती गावात पसरताच अनेक यादव समर्थक सत्यप्रकाश दुबेच्या घरी आले. त्यांनी बदला म्हणून सत्यप्रकाश यांची हत्या केली. तसेच, त्यांच्या घरातील चार जणांवरही हल्ला केला. परिणामी, दुबे यांच्यासह त्यांचे कुटुंबीय या हल्ल्यात मृत झाले. मृतांमध्ये दुबे यांची पत्नी, दोन मुली व एका मुलाचा समावेश आहे.