जमिनीच्या वादातून मोरजीत स्थानिकाचा खून

0
3

बिगर गोमंतकीयांनी मारहाण केल्याचा नातेवाईक, स्थानिकांचा दावा

वरचावाडा मोरजी येथील सत्पुरुष मंदिराच्या मागे उमाकांत खोत (64) यांचा जमिनीच्या वादातून खून झाला आहे. हा खून बिगर गोमंतकीयांनी मारहाण केल्यामुळे झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्या संदर्भात पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी, तपास सुरू असून शवचिकित्सा अहवालानंतर चित्र स्पष्ट होईल अशी माहिती दिली.

काल बुधवारी 5 रोजी दुपारी दीड वाजता नेहमीप्रमाणे उमाकांत खोत हे आपल्या शेतजमिनीची पाहणी करण्यासाठी गेले असता त्यांच्याच मालमत्तेमध्ये जेसीपीद्वारे बेकायदा डोंगर कापणी सुरू असल्याचे त्यांना दिसून आले. यावेळी त्यांनी जाब विचारला. यावेळी त्यांना बिगर गोमंतकीयांनी मारहाण केली. यात उमाकांत हे जबर जखमी झाले. त्यानंतर जखमी अवस्थेत त्यांना तुये इस्पितळात रुग्णवाहिकेने दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले अशी माहिती खोत यांच्या नातेवाइकांनी दिली.

मांद्रे पोलिसांनी ही घटना घडलेला परिसर सील केला आहे. याबाबत काही पुरावे सापडतात का याची पाहणी स्वतः उत्तर गोवा पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता, पेडणे तालुका पोलीस उपाधीक्षक सलीम शेख, मांद्रे पोलीस निरीक्षक वीरेंद्र नाईक व पोलीस उशिरापर्यंत घटनास्थळी करत होते.
उमाकांत खोत हे ज्या जमिनीमध्ये कुळ म्हणून होते. ती जमीन जोशी नामक जमीनदाराची आहे. अर्धा भाग जमीनदाराने दिल्लीवाल्यांना विकलेला आहे. परंतु उमाकांत खोत यांचा जमीन विकण्यास विरोध होता.

मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

खोत यांच्या नातेवाइकांनी, आम्हाला सरकारने न्याय द्यावा. जोपर्यंत संशयितांना पकडले जात नाही आणि त्यांच्यावर कडक कारवाई केली जात नाही. तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही असा इशारा दिला. दरम्यान, मांद्रे पोलिसांनी तिथल्या 14 कामगारांना ताब्यात घेतले आहे.