>> सरकार नियुक्त समितीकडून अंतरिम अहवाल सादर; मंत्री सुभाष फळदेसाईंची माहिती
राज्य सरकारने पोर्तुगीज कालखंडात मोडण्यात आलेल्या मंदिराचा अभ्यास करण्यासाठी नियुक्त केलेल्या खास समितीला सुमारे 1 हजारांहून अधिक जुनी मंदिरे मोडण्यात आल्याचे आढळून आले आहे. पोर्तुगीज कालखंडात मोडण्यात आलेली मंदिरे जमिनींच्या वादांमुळे पुन्हा उभारण्याचे काम खूप जटिल आहे. परिणामी सदर समितीने सर्वांचे प्रतीक म्हणून एक स्मारक मंदिर उभारण्याची शिफारस केली आहे, अशी माहिती पुरातत्त्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी काल दिली.
पुरातत्त्व खात्याने नियुक्त केलेल्या खास समितीने अंतरिम अहवाल सादर केला आहे. या अहवालावर सरकारी पातळीवर अजूनपर्यंत चर्चा झालेली नाही, असेही फळदेसाई यांनी स्पष्ट
केले.
राज्यातील पुरातन मंदिराबाबत नागरिकांकडून माहिती मागविण्यात आली होती. पुरातत्त्व खात्याकडे आलेले सर्व अर्ज खास समितीकडे सुपूर्द करण्यात आले होते. त्या समितीने प्रत्येक अर्जाची छाननी करून जागेची प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल तयार केला आहे. जुन्या मंदिराच्या जागी काही अवशेष सुध्दा आढळून आलेले आहेत. त्याच ठिकाणी पुन्हा पुरातन मंदिर बांधणे विविध कारणांमुळे शक्य नसल्याचे समितीला आढळून आले आहे. त्यामुळे समितीने एका स्मारक मंदिराची शिफारस केली आहे. स्मारक मंदिर हे मंदिरे असलेल्या तीन तालुक्यांपैकी एका तालुक्यात उभारण्याची सूचना करण्यात आली आहे. सदर स्मारक मंदिर पर्यटन स्थळ म्हणून वापर केला जाऊ शकतो. तसेच, ऐतिहासिक माहितीसाठी वापर केला जाऊ शकतो, असेही फळदेसाई यांनी सांगितले.
दिवाडी जुवे येथे जमीनदोस्त करण्यात आलेल्या मूळ सप्तकोटेश्वर मंदिराचा पुन्हा जीर्णोद्धार करावा, अशी शिफारस समितीने केली आहे. राज्यातील सासष्टी, तिसवाडी आणि बार्देश या तीन तालुक्यांत सर्वाधिक पुरातन मंदिरे होती. पोर्तुगीज कालखंडात या मंदिरांचा विध्वंस करण्यात आला, असेही समितीला अभ्यासात आढळून आले आहे.