जमावबंदीचा आदेश मागे घ्या

0
11

>> खांडेपार ग्रामस्थांकडून पणजीत निदर्शने

मुर्डी-खांडेपार येथे खांडेपार नदीवर जलस्रोत खात्याच्या नियोजित बंधाऱ्याचे काम मार्गी लावण्यासाठी लागू केलेले जमावबंदीचे कलम 144 मागे घेण्याच्या मागणीसाठी स्थानिक ग्रामस्थांनी येथील आझाद मैदानावर काल निदर्शने केली.

मुर्डी-खांडेपार येथील नियोजित बंधाऱ्याच्या कामाला स्थानिकांकडून विरोध केला जात आहे. त्यामुळे राज्य सरकारने जमावबंदीचे कलम 144 लागू करून बंधाऱ्याचे सर्वेक्षण व इतर कामे सुरू केली आहे. या जमावबंदीच्या कलमामुळे स्थानिक नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे राज्य सरकारने जमावबंदीचे कलम त्वरित मागे घ्यावे आणि बंधाऱ्याचे काम थांबवावे, अशी मागणी ग्रामस्थांनी काल केली.

गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व आमदार विजय सरदेसाई यांनी आझाद मैदानावरील निदर्शनात सहभागी होऊन ग्रामस्थांना पाठिंबा जाहीर केला. तसेच, आदिवासी समाजातील काही नेत्यांनी निदर्शनात सहभाग घेतला.
मुर्डी-खांडेपार येथील ग्रामस्थांकडून खांडेपार नदीवरील नियोजित बंधाऱ्याला विरोध केला जात आहे. स्थानिक आमदार तथा कृषीमंत्री रवी नाईक यांची भेट घेऊन बंधाऱ्याच्या कामाला विरोध करून ते बंद करण्याची मागणी केलेली आहे; मात्र सरकारी पातळीवरून बंधाऱ्याचे काम सुरू असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

मुर्डी गावाचा सखल भागात समावेश होतो. दरवर्षी या भागात पुराची समस्या निर्माण होते. 2021 मध्ये मुर्डी येथे मोठा पूर आला होता. याठिकाणी बंधाऱ्याचे बांधकाम केल्यास स्थानिकांना भविष्यात पुराचा त्रास होणार आहे, असा दावा ग्रामस्थांनी केला आहे.