
जमशेदपूर एफसी व ऍटलेटिको दी कोलकाता यांच्यात आज जमशेदपूर येथे इंडियन सुपर लीगमधील सामना खेळविला जाणार आहे. पदार्पण करणार्या जमशेदपूरचा आपल्या घरच्या मैदानावरील हा पहिलाच सामना असेल. जमशेदपूरचा एटीकेपेक्षा एक गुण अधिक असून घरच्या प्रेक्षकांसमोर चांगली कामगिरी करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. जमशेदपूरला आपल्या दोन्ही सामन्यात बरोबरीवर समाधान मानावे लागले आहे. या दोन्ही लढतीत त्यांना गोल नोंदविण्यात मात्र अपयश आले आहे.
दुसरीकडे एटीकेने केरला ब्लास्टर्सविरुद्ध गोलशून्य बरोबरीने प्रारंभ केला. त्यानंतर घरच्या मैदानावर त्यांना एफसी पुणेसिटीविरुद्ध १-४ अशा मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला आहे. या लढतीत स्टीव कॉप्पेल आणि टेडी शेरींगहॅम हे पूर्वी मँचेस्टर युनायटेडकडून खेळलेले दोन इंग्लिश प्रशिक्षक आमनेसामने येत आहेत. दोन्ही संघांना अजूनपर्यंत विजय मिळविता आलेला नसून पहिल्या विजयासाठी उभय संघांना खेळ उंचवावा लागणार आहे. बचावफळीतील विस्कळितपणाचा फटका एटीकेला दोन्ही सामन्यात बसला आहे. त्यामुळे आज अधिक सुसूत्रता दाखवून नवख्या जमशेदपूरवर त्यांना दबाव टाकावा लागेल. अन्यथा आजही त्यांची पाटी कोरीच राहू शकते.