हीरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) जमशेदपूर एफसीची गुरुवारी येथील जेआरडी टाटा क्रीडा संकुलात चेन्नईन एफसीविरुद्ध लढत होत आहे. चेन्नई गुणतक्त्यात आघाडीवर असून त्यांच्यासमोर जमशेदपूरच्या चिवट बचाव फळीचे आव्हान असेल.
पदार्पण करणार्या जमशेदपूरचे प्रशिक्षक स्टीव कॉप्पेल आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा संघ सर्वाधिक आकर्षक खेळ करीत नसला तरी भक्कम बचावामुळे ते कडवे प्रतिस्पर्धी ठरतात. जमशेदपूर नऊ गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. आघाडीवरील संघांमध्ये कमालीची चुरस आहे. त्यामुळे जिंकल्यास जमशेदपूरचे गुण चेन्नईपेक्षा केवळ एकाने कमी असतील. जमशेदपूरला फारसे गोल करता आले नसले तरी त्यांनी खूप गोल पत्करलेले सुद्धा नाहीत. त्यांचा एकच पराभव झाला आहे. तीन बरोबरी आणि दोन विजय अशी त्यांची कामगिरी आहे. जमशेदपूरचे पदार्पण असले तरी इंग्लंडच्या कॉप्पेल यांनी अत्यंत व्यावहारिक दृष्टिकोन ठेवला आहे.
संघाला बरेच गोल करण्यात आलेले अपयश आणि खेळाची शैली याविषयी कॉप्पेल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत भाष्य केले. ते म्हणाले की, संघाला दिर्घकालीन उद्दीष्टांचा विचार करावा लागेल. मोसमाच्या अखेरीस अडचणीची स्थिती नसेल यासाठी दक्षता घ्यावी लागेल. आम्ही खेळलेले सामने आणि केलेले गोल पाहता आव्हान मोठे आहे, पण आम्ही प्रयत्नांमध्ये कमी पडतो आहोत असे नाही. आम्ही नेहमीप्रमाणेच कसून सराव करीत आहोत.
जमशेदपूरला पहिल्या पसंतीचा सेंटर-बॅक अनास एडाथोडीका याच्या अनुपस्थितीत खेळावे लागू शकेल. त्याला दुखापत झाली आहे. मध्य फळीतील स्टार खेळाडू मेहताब होसेन हा मात्र तंदुरुस्त झाला आहे.चेन्नईला दक्षिण डर्बीत केरळा ब्लास्टर्सविरुद्ध एका गुणावर समाधान मानावे लागले. इंग्लंडच्या जॉन ग्रेगरी यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणारा हा संघ सात सामन्यांतून १३ गुणांसह आघाडीवर आहे.
इंग्लंडच्याच कॉप्पेल यांच्या संघाविरुद्धची लढत सोपी नसल्याची जाणीव ग्रेगरी यांना आहे. ते म्हणाले की, जमशेदपूरला हरविणे फार अवघड असल्याचे दिसून आले आहे. त्यांनी बरेच गोल केले नसले तरी फार पत्करलेले सुद्धा नाहीत. मी स्टीव कॉप्पेल यांना चांगले ओळखतो. त्यांनी संघाकडून चांगली तयारी करून घेतली आहे.