गोवा कला अकादमीच्या नूतनीकरणावर कोट्यवधी रुपये खर्च करूनही ते सर्व काम निकृष्ट दर्जाचे झाल्याची कबुली सरकारनियुक्त कृतिदलाने अगदी जाहीरपणे आणि पत्रकार परिषद घेऊन दिली आहे. वास्तविक, सरकारनियुक्त कृतिदलाने आपल्या पाहणीचे निष्कर्ष अहवालाद्वारे सरकारला रीतसर सादर करायचे असतात. परंतु केवळ कला अकादमीच्या एका पाहणीनंतर आणि एकच बैठक झालेली असताना थेट पत्रकार परिषद घेऊन हे निष्कर्ष जगजाहीर करण्याचे कारण काय हे मात्र आम्हाला कळलेले नाही. राज्याचे कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांना लक्ष्य करण्यासाठीच कृतिदलाचे अध्यक्ष विजय केंकरे यांच्या मार्फत हा पत्रकार परिषदेचा घाट गावडेविरोधकांनी घातला असावा, असा तर्क त्यामुळे जनतेत व्यक्त होताना दिसतो आणि तो उडवून लावण्यासारखा नाही. कला अकादमीच्या पाहणीत निघालेले निष्कर्ष अहवालाद्वारे सरकारच्या नजरेस आणण्यापूर्वीच पत्रकार परिषद घेणे योग्य ठरणार नाही ही समज कृतिदलाचे अध्यक्ष विजय केंकरे यांना असायला हवी होती. त्यांचे वडील दामू केंकरे हे कला अकादमीच्या उभारणीत सक्रिय होते, त्या पुण्याईवरच विजय केंकरे यांची ह्या कृतिदलाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. ते एक रंगकर्मी जरूर आहेत, परंतु नूतनीकरणाच्या कामाची गुणवत्ता तपासण्याची तांत्रिक पात्रता त्यांच्यात आहे का ह्याबाबत आमच्या मनात शंका आहे. अहवाल सरकारला सादर करण्याआधीच पत्रकार परिषदेची ही घाई का, त्यामागे काही राजकीय कारणे आहेत का, ह्या प्रश्नाचे उत्तर त्यांनी द्यावे लागेल. कृतिदलातील अनेक सदस्यांतही नूतनीकरण बांधकामाची गुणवत्ता तपासण्याची तांत्रिक पात्रता नाही. त्यामुळे बांधकाम, वातानुकूलन, ध्वनियंत्रणा, प्रकाशयोजना आदी क्षेत्रातील तज्ज्ञच ह्या कामाची गुणवत्ता काय हे सप्रमाण सांगू शकतील. कलाकारांना ते उमजेलच असे नव्हे. आता संबंधित कामांच्या कंत्राटदारांना कृतिदलाने बैठकीसाठी बोलावले आहे. कंत्राटदारांना त्यांच्या कामातील केवळ त्रुटी दाखवून देणे पुरेसे नाही, तर त्यांना जबाबदार धरून सर्व चुका दुरुस्त करून घेण्याची अधिक गरज आहे. मुळात ह्या कृतिदलाच्या स्थापनेमागे जनतेमधील असंतोष शांत करणे हाच सरकारचा हेतू होता. त्यामुळे कला व संस्कृती मंत्र्यांचे समर्थक आणि विरोधक यांचा मेळ घालून हे कृतिदल स्थापन करून सरकार मोकळे झाले. परंतु आता जेव्हा हे कृतिदलच कला अकादमीचे काम निकृष्ट झाल्याचे सांगत असेल आणि उद्या त्यांच्या अहवालातूनही त्याला दुजोरा मिळेल हे जर गृहित धरले, तर आता ह्या सगळ्या निकृष्ट कामाची जबाबदारी कोण घेणार हा मुख्य प्रश्न उभा राहतो. येथे खरे तर ना मंत्री गावडे महत्त्वाचे आहेत, ना त्यांचे विरोधक. महत्त्व आहे ते गोवा कला अकादमीच्या नूतनीकरणाला. कोट्यवधी रुपये खर्चून आणि बराच मोठा कालापव्यय करूनही जर हे सर्वच काम निकृष्ट दर्जाचे झालेले असेल, तर ह्याची जबाबदारी आता कोणाची हे सरकारला सांगावे लागेल. गावडे हे कला व संस्कृती खात्याचे आणि कला अकादमीचे जरी प्रमुख असले, तरी प्रत्यक्ष नूतनीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली झालेले आहे आणि त्यामुळे ती त्या खात्याची जबाबदारी अधिक ठरते. संबंधित कंत्राटदारांना विनानिविदा कंत्राटाची वर्कऑर्डर देणारे, त्यांच्या कामासंबंधी जनतेच्या तक्रारी असतानाही बाष्कळ कारणे पुढे करून वेळोवेळी त्यांना क्लीन चीट देणारे ह्यांचे आता काय होणार? कला अकादमी प्रकरणाच्या निमित्ताने राज्यातील कलाकारांच्या दोन गटांनी आपापले ईप्सित साध्य केले. गावडे यांच्या विरोधकांनी ह्या संधीचे निमित्त साधून कला हितराखण मंचाच्या नावाखाली गहजब माजवून टीकेचा सगळा रोख मंत्री गावडे यांच्या रोखानेच वळेल ह्याची जातीने खातरजमा केली. त्यामागील वैयक्तिक कारणे गुलदस्त्यात आहेत. दुसरा एक कला आणि संस्कृती खात्याच्या विविध योजना आणि अनुदानांचा लाभार्थी गट होता, ज्याने ह्या निमित्ताने गावडे यांना आपले समर्थन देऊन आपले उखळ पांढरे करून घेतले. गावडे हे कला आणि संस्कृती मंत्रिपदी आले होते तेव्हा त्यांच्या सत्कारासाठीही कलाकार मंडळीच पुढे झाली होती. आणि आता त्यांना पदावरून उतरवण्याची घाईही कलाकारांनाच झालेली आहे. कला अकादमीचे निकृष्ट काम हे त्यासाठीचे केवळ एक निमित्त ठरते आहे. मुख्य लक्ष्य गावडे हे आहेत. परंतु आम जनतेला आस्था आहे ती कला अकादमीत. गावडे मंत्रिपदी असले काय, नसले काय जनतेला फरक पडत नाही, परंतु कला अकादमीचा जो काही एकूण खेळखंडोबा झालेला आहे, त्यामुळे गोमंतकीय जनता व्यथित आहे, संतप्त आहे. तिला गोव्याचा मानबिंदू असलेली कला अकादमी लवकरात लवकर सुस्थितीत आलेली हवी आहे. सरकारने त्याबाबत सक्रिय हवे.