जगभरात नववर्षाची धामधूम सुरू असताना काल जपानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. जपानमध्ये सोमवारी 7.6 ‘रिश्टर स्केल’ तीव्रतेचा जोरदार भूकंपाचा धक्का बसला. यानंतर जपानच्या हवामान विभागाने त्सुनामीचा इशारा दिला. कल इशिकावा परिसरातील वाजिमा किनाऱ्यावर 1.2 मीटर उंचीच्या लाटा उसळल्या.
जपानच्या हवामान विज्ञान विभागाने दिलेल्या माहितीनुसार इशिकावा प्रांतातील अनामिझू शहरात हा भूकंप झाला. त्याचे केंद्र पृथ्वीच्या 10 किलोमीटर खाली होते. भारतीय वेळेनुसार दुपारी 12.40 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. अवघ्या 8 मिनिटांनंतर, 6.2 तीव्रतेचा पहिला आफ्टरशॉक नोंदवला गेला. यानंतर 5.2 रिश्टर स्केलचा दुसरा आफ्टरशॉक नोंदवण्यात आला. तसेच 4 रिश्टर स्केल तीव्रतेचे 21 धक्के नोंदवले गेले.
भूकंपानंतर नागरिकांमध्ये एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले. या भूकंपामुळे अनेक इमारतींचे नुकसान झाले असून, अनेक नागरिक जखमी झाले. भूकंपामुळे रस्त्यांना तडे गेल्याने मध्य जपानमधील अनेक महामार्ग बंद करण्यात आलेले आहेत. तसेच, भूकंपानंतर वीजपुरवठा खंडित झाला असून, 34 हजार नागरिकांना याचा फटका बसला आहे.