म्यानमारमधील विनाशकारी भूकंपानंतर काल जपानमध्येही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 6.0 इतकी होती. जपानच्या क्युशू राज्यात भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:34 वाजता भूकंपाचे धक्के नोंदवण्यात आले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी (एनसीएस) नुसार, या भूकंपाचे केंद्र क्यूशू बेटावर होते. या भूकंपामुळे जपानमध्ये अद्याप कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही, परंतु लोक घाबरून घराबाहेर पडले आहेत. जपानमध्ये भूकंप ही नवीन गोष्ट नाही, हा देश भूकंपांच्या बाबतीत संवेदनशील मानला जातो. पण काळानुसार येथील सरकारने अशा व्यवस्था केल्या आहेत की भूकंपानंतरही जास्त नुकसान होण्याची शक्यता कमी असते. क्यूशू हे जपानमधील तिसरे सर्वात मोठे बेट आहे आणि भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून ओळखले जाते. स्थानिक प्रशासनाने रहिवाशांना सतर्क राहण्याचा आणि संभाव्य भूकंपांसाठी तयार राहण्याचा सल्ला दिला आहे.