>> जगाला अण्वस्त्रमुक्त करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल नॉर्वेजियन नोबेल समितीकडून सन्मान
निहोन हिदानक्यो या जपानी संस्थेला यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. नॉर्वेजियन नोबेल समितीने शुक्रवारी ही घोषणा केली. जगात अण्वस्त्रांच्या विरोधात दीर्घकाळ मोहीम चालवल्याबद्दल या संघटनेला यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात येत असल्याचे नोबेल समितीने म्हटले आहे. ही संघटना जगाला आण्विक शस्त्रांपासून मुक्त करण्यासाठी अनेक वर्षांपासून संघर्ष करत आहे. या संघटनेत दुसऱ्या महायुद्धात हिरोशिमा आणि नागासाकीवर झालेल्या अण्वस्त्र हल्ल्यातून वाचलेल्यांचा समावेश आहे. त्यांना हिबाकुशा म्हणतात.
निहोन हिदानक्यो संघटनेला पुरस्कार जाहीर करताना नॉर्वेजिन नोबेल समितीने म्हटले आहे की, दुसऱ्या महायुद्धादरम्यान हिरोशिमा आणि नागासाकी येथे अणुबॉम्ब टाकण्यात आले होते. या हल्ल्यातून वाचलेल्या लोकांनी जग आण्विक शस्त्रांपासून मुक्त करण्यासाठी तळागाळात आंदोलन केले. या संघटनेने दीर्घ काळापासून केलेल्या प्रयत्नांना आणि कार्यासाठी शांततेचा नोबेल पुरस्कार दिला जात आहे. जगात पुन्हा अणुबॉम्बचा वापर पुन्हा केला जाऊ नये, यासाठी ही संघटना प्रयत्नशील आहे.
नॉर्वेजियन नोबेल समितीने पुढे असे म्हटले आहे की, निहोन हिदानक्यो या वर्षी शांततेचा नोबेल देण्याचे आम्ही ठरवले याचे मुख्य कारण म्हणजे गेल्या 80 वर्षांत कोणत्याही युद्धात आण्विक शस्त्रांचा वापर झाला नाही. निहोन हिदानक्यो आणि हिबाकुशाच्या अन्य प्रतिनिधिंनी केलेल्या असाधारण प्रयत्नांमुळे आण्विक शस्त्रांचा वापर टाळण्यास मदत झाली आहे.
हे हिबाकुशा निहोन हिदानक्यो संस्थेच्या माध्यमातून जगभरात अणुयुद्धामुळे ओढवलेल्या दुःखाच्या आणि वेदनादायक आठवणी शेअर करतात. नोबेल समितीने म्हटले आहे की, एके दिवशी अण्वस्त्र हल्ल्यांना सामोरे गेलेले हे लोक आता आपल्यासोबत नसतील; परंतु जपानची नवीन पिढी त्यांच्या आठवणी आणि अनुभव जगासोबत शेअर करत राहील आणि जगासाठी अण्वस्त्रे किती धोकादायक आहेत याची आठवण
करून देईल.
आतापर्यंत 112 जणांना शांततेचा नोबेल
नोबेल शांतता पुरस्कार 1901 मध्ये सुरू झाला. आतापर्यंत 112 लोकांना आणि 30 संस्थांना हा सन्मान मिळाला आहे. 5 वेळा नामांकन होऊनही महात्मा गांधींना शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला नाही, त्यावर अनेकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.