जन्म-मृत्यूसह अन्य दाखले सप्टेंबर अखेरपर्यंत ऑनलाइन

0
157

>> मुख्यमंत्री पर्रीकर यांची घोषणा

जन्म – मृत्यू तसेच मालमत्तेशी संबधित सर्व दाखल्याचे मायक्रोफिल्मिंग व डिजीटलायझेशन करण्याचे काम यापूर्वीच पूर्ण झाले आहे. ज्या कंपनीने ते काम केले आहे त्यांचा व सरकाराची कार्यक्रम पद्धती वेगळी असल्याने दाखले उपलब्ध करून देण्यास तांत्रिक अचडण निर्माण झाली होती. ती अचडण आता दूर झाली असून येत्या सप्टेंबर अखेरपर्यंत संगणकावर ऑनलाइन पद्धतीने ते उपलब्ध होतील, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल विधानसभेत कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नावर सांगितले.
संगणकावरच वरील दाखले उपलब्ध होणार असल्याने नियोजन व संाख्यिकी खात्याचे दक्षिण गोव्यात कार्यालय स्थापन करण्याची आवश्यकताच भासणार नाही, असेही पर्रीकर यांनी सांगितले. पुरातत्व खात्यात असलेले दाखले पहाण्यासाठी लोक येतात व कागदच घेऊन जातात. त्यामुळे सद्या दाखले दाखविणे बंद केले आहे, असे ते म्हणाले. सिव्हील रजिस्ट्रार कार्यालयाकडे सर्वसामान्यांचा संबंध येतो. त्यामुळे अशा खात्याची कार्यालये तळमजल्यावर असणे आवश्यक आहे. म्हापसा येथील कार्यालय तळमजल्यावर आणण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना दिले. या प्रश्‍नावरील चर्चेत आमदार नीलेश काब्राल, आमदार ग्लेन टिकलो यांनी भाग घेतला.