‘जनशताब्दी’ची जेसीबीला ठोकर; १५ जखमी

0
185
जेसीबीला धडक बसल्याने जनशताब्दी एक्सप्रेसचे डबे अशाप्रकारे कापले गेले. (छाया : हरिश्चंद्र पवार)

कोकण रेल्वे मार्गावर कणकवली स्थानकानजीक, ओसरगाव बोर्ड्वे येथे धावत्या जनशताब्दी एक्स्प्रेसवर काल सायंकाळी जेसीबी पडल्यामुळे अपघात झाला. यात १५ प्रवासी जखमी झाले असून एका महिलेला डोक्याला दुखापत झाल्याने तिची स्थिती गंभीर आहे. दरम्यान, अपघातानंतर काही वेळाने रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.
जिल्हा प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत तातडीने मदत कार्य सुरु केले. जखमींना कणकवली रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी शिल्पा केसरकर (३५) रा. मालवण या महिलेच्या डोक्याला मार लागल्याने तिची स्थिती गंभीर आहे. जनशताब्दी एक्स्प्रेस मडगावहून मुंबईकडे निघाली असता, बोर्डवे येथे सायंकाळी ६ वा. पोचली तेव्हा धावत्या रेल्वेखाली अचानक जेसीबी पडून हा अपघात झाला. बोर्ड्वे गावाजवळ पुलाचे काम जेसीबीच्या सहाय्याने सुरु होते. यावेळी, अचानक हा जेसीबी रेल्वेवर पडल्यामुळे प्रवाश्यांना काही कळण्याच्या आताच ही घटना घडली यात कोकण रेल्वेचे चार डबे फाटले गेले. वेगात असलेल्या रेल्वेचे चार डबे ठिकठिकाणी कापले गेले आहेत. अपघातामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. संध्याकाळी उशीरा वाहतूक सुरळीत करण्यात आली.
जखमींची नावे : प्रियंका चव्हाण (३०, रा. ठाणे ), कल्पेश चव्हाण ( २५, ठाणे ), शोभा कदम ( ५८, रा. दहिसर ), धनंजय पांडे ( ४२ रा. नवी मुंबई ), लोजेना फेराव ( ४४, गोवा ), श्रीकांत गावडे ( रा. वेंगुर्ला-मठ ), चित्रा करमळकर ( ३२, रा. भराडी नाका ), शुभांगी मुंज ( ६९, रा. मुलुंड मुंबई ), प्रिया प्रभू ( ३६ रा, मुंबई ), रसर मॅस्करेनस ( २६, रा. पनवेल ), निकुंश पालव ( ६०, रा. कुडाळ ), मोरेश्वर मुंज ( रा. मुंलुंड पूर्व ), न्हानू गावडे ( ४५, रा. वेरणे ), रिचर्ड मस्करनेस ( ५८, रा. नवे पनवेल ), शेरीज सेश्री ( ४५, रा. मुंबई ).