जननायक

0
50

डॉ. राममनोहर लोहिया, आचार्य नरेंद्र देव, जयप्रकाश नारायण यांच्या तालमीत तयार झालेले दिवंगत समाजवादी नेते कर्पुरी ठाकुर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ जाहीर करून मोदी सरकारने अत्यंत साधी राहणी असलेल्या एका तत्त्वनिष्ठ, प्रामाणिक नेत्याचा यथार्थ सन्मान तर केला आहेच, परंतु विद्यमान राजकीय परिस्थितीत एक जोरदार मास्टरस्ट्रोकही लगावला आहे. सत्तर आणि ऐंशीच्या दशकांत कर्पुरी ठाकुर समाजवादी राजकारणात प्रदीर्घ काळ वावरले. खेड्यात जन्मलेल्या, अतिमागास गणल्या गेलेल्या नाभिक समाजातून आलेल्या ह्या नेत्याने दलित, शोषित, वंचितांच्या उद्धारासाठी अविरत कार्य केले. त्यामुळेच ते जननायक ठरले. बिहारचे मुख्यमंत्रिपद त्यांना दोनवेळा लाभले. परंतु सत्तेवर असूनही ते आणि त्यांचे कुटुंब जातिवंत साधेपणानेच राहिले. त्यामुळे काल त्यांच्या मृत्यूनंतर 36 वर्षांनी, त्यांच्या जन्मशताब्दीच्या पूर्वसंध्येस जेव्हा त्यांना मरणोत्तर भारतरत्न जाहीर झाले, तेव्हा त्यांच्या त्या साधेपणाच्या ज्या असंख्य कहाण्यांना उजाळा मिळाला, त्या साऱ्या आजच्या काळातील राजकारण्यांची वखवख पाहता दंतकथाच वाटू लागतात. कर्पुरी ठाकुर बिहारच्या मुख्यमंत्रिपदावर असताना त्यांची पत्नी गावी शेतात बकरी चारायची. मुख्यमंत्री बनताच आपल्या मुलाला रामनाथला त्यांनी पत्र लिहिले होते की आता मी मुख्यमंत्री बनलो आहे. लोक तुझ्या मागे लागतील, तुला लाच देण्याचा प्रयत्न करतील. परंतु स्वच्छ राहा. ते मुख्यमंत्री असूनही त्यांचे कुटुंब समस्तिपूरमधल्या त्यांच्या पितौझिया ह्या खेड्यात साध्या वडिलोपार्जित घरातच राहिले. कर्पुरी ठाकुरांचे निधन झाले तेव्हा त्यांचे ते झोपडीवजा घर पाहून हेमवतीनंदन बहुगुणांना रडू फुटले होते. मृत्यूसमयी एखादा भूखंड सोडाच, ते घरही त्यांच्या नावावर नव्हते. कर्पुरी ठाकुरांच्या जन्मजात साधेपणाचे असंख्य किस्से आहेत. माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा हे कर्पुरी ठाकूर मुख्यमंत्री असताना त्यांचे मुख्य सचिव होते. त्यांना तर त्यांच्या साधेपणाचे अत्यंत जवळून दर्शन घडले. दिवसरात्र ते कसे काम करायचे, थकून भागून विश्रामधामावरच कसे झोपून जायचे त्या आठवणी सिन्हांनी लिहिल्या आहेत. एकदा त्यांच्या घरी जायचा योग आला तेव्हा घरातील लाकडी स्टुलावर बसल्याची आठवणही त्यांनी सांगितली आहे. मुख्यमंत्रिपदावर असताना कर्पुरींचा एक जवळचा नातलग त्यांच्याकडे सरकारी नोकरी मागायला आला. तेव्हा खिशातून पंचवीस रुपये काढून देऊन त्यांनी त्याला वस्तरा खरेदी करून आपल्या पिढीजात व्यवसायातून उपजीविका करण्याचा सल्ला दिला होता. आपल्या मुलीचे लग्नही त्यांनी अत्यंत साधेपणाने केले होते. त्यासाठी गावी जाताना सरकारी वाहन न वापरता ते स्वखर्चाने टॅक्सीने गेले होते. आजकालच्या समाजवादी नेत्यांची आलिशान राहणी, त्यांनी आपल्या मुलांच्या विवाहसोहळ्यांवर उधळलेले कोट्यवधी रुपये पाहता, कर्पुरी ठाकुरांचा हा साधेपणा थक्क करून जातो. स्वतः जुन्या फाटक्या कुर्त्यात वावरणाऱ्या ह्या नेत्याची चेष्टा करून त्यांच्या समाजवादी सहकाऱ्यांनी त्यांना काही पैसे गोळा करून नवा कुर्ता धोती खरेदी करायची तंबी दिली, तेव्हा ते पैसेही त्यांनी मुख्यमंत्री मदतनिधीत जमा करून टाकले होते. आपल्या मागासवर्गीय समाजबांधवांप्रती त्यांना आत्यंतिक कणव होती. ‘अधिकार चाहो तो लडना सीखो’ हा त्यांना त्यांचा संदेश होता. मुख्यमंत्री असताना 1978 साली मुंगेरीला आयोगाच्या शिफारशीनुसार त्यांनी मागासवर्गीयांना 26 टक्के आरक्षण लागू केले होते. बिहारमधील 78 मागास जातींना त्यामुळे उत्कर्षाची वाट सापडली. मात्र, हे आरक्षण लागू करीत असताना केवळ जातीपातींपुरते न पाहता सवर्णांमधील आर्थिक मागास घटकांना तीन टक्के आरक्षणाची तरतूद करण्यासही ते विसरले नव्हते. सर्व जातींच्या महिलांसाठी तीन टक्के आरक्षण लागू करून आजच्या 33 टक्के आरक्षणाचा पाया त्यांनीच घालून दिला होता. गोरगरीबांच्या मुलांना शाळेत वह्या, पुस्तके, पाटी, पेन्सील सरकारतर्फे मोफत पुरवण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. गोरगरीबांची मुले त्यामुळे शिकू शकली. बिहारच्या अतिमागास जातींचे प्रमाण आजही लोकसंख्येच्या 36 टक्के आहे. 112 जाती त्यात येतात. त्यामुळे राजकीयदृष्ट्या ह्या वर्गाला फार महत्त्व आहे. संयुक्त जनता दल, राष्ट्रीय जनता दलासारखे पक्ष त्याचेच भांडवल करीत असतात. नितीशकुमार, लालूप्रसाद यादव हे सर्व कर्पुरी ठाकुरांचेच शिष्यत्व सांगत मोठे झाले. कर्पुरी ठाकुर यांच्यासारख्या एका समाजवादी नेत्याला आणि त्यातही मागासवर्गीयांच्या नेत्याला ‘भारतरत्न’ घोषित करून मोदी सरकारने त्या दोन्ही पक्षांना लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा राजकीय दणका दिला आहे हेही ओघाने आलेच!