विधानसभा निवडणुकीत जनतेने दिलेला कौल कॉंग्रेस पक्षाला मान्य असून, कॉंग्रेस पक्ष सक्षम विरोधकाची भूमिका निभावणार आहे, असे निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम् यांनी निकालानंतर काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
गोव्यात भाजप सरकारच्या विरोधात नागरिकांमध्ये नाराजी पसरली होती. भाजप विरोधातील लोकांची मते कॉँग्रेसकडे वळविण्यात आम्ही कमी पडलो, अशी कबुली चिदंबरम् यांनी दिली. भाजप सरकारच्या विरोधात नागरिकांत नाराजी असल्याचे निवडणूक निकालावरून स्पष्ट होत आहे. भाजप विरोधातील पक्षांना ६६ टक्के मते मिळाली, तर भाजपला केवळ ३३ टक्के मिळाली आहेत. विविध राजकीय पक्षातील मतविभागणीचा भाजपला लाभ मिळाला. कॉंग्रेसचे काही मतदारसंघातील उमेदवार थोड्याशा मतांनी पराभूत झाले आहेत. कॉंग्रेसला सहा-सात जागा गमावाव्या लागल्या; अन्यथा कॉंग्रेस आघाडीला १९ च्या आसपास जागा मिळाल्या असत्या, असेही चिदंबरम यांनी सांगितले.