जगावर कोरोनाच्या नव्या रूपाचे सावट

0
258

>> विषाणूचे नवे रूप अधिक घातक

>> भारताकडून ब्रिटनची हवाई सेवा स्थगित

ब्रिटनमध्ये नुकतेच कोरोना विषाणूचे एक नवे रूप आढळून आले असून पूर्वी आढळलेल्या विषाणूपेक्षा ते कितीतरी अधिक पटीने संसर्गजन्य व घातक असल्याचे दिसून आल्याने जगभरातील देशांनी ब्रिटनची हवाई सेवा स्थगित केली आहे. भारत सरकारनेही काल घेतलेल्या तातडीच्या बैठकीत ब्रिटनची हवाई सेवा येत्या ३१ डिसेंबरपर्यंत स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला.

ब्रिटनला जाणार्‍या येणार्‍या विमानांवरील ही बंदी मंगळवारी रात्री ११.५९ पासून लागू झाली असून ती तूर्त येत्या ३१ डिसेंबर रोजी मध्यरात्री ११.५९ वाजेपर्यंत लागू राहील असे भारत सरकारने काल घोषित केले. ब्रिटनमधील कोरोना संसर्गाच्या नव्या उद्रेकामुळे हा निर्णय घ्यावा लागत असल्याचेही भारत सरकारने स्पष्ट केले आहे. हवाई वाहतूक मंत्रालयाने काल यासंदर्भात ट्वीटरवरून दिलेल्या माहितीत ‘‘ब्रिटनमधील सध्याची परिस्थिती विचारात घेऊन भारत सरकारने ब्रिटनहून भारतात येणारी सर्व विमाने ३१ डिसेंबर २०२० (मध्यरात्री ११.५९ पर्यंत) स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे’’ असे म्हटले आहे. ही बंदी काल रात्री लागू होईपर्यंत ब्रिटनहून येणार्‍या सर्व विमानप्रवाशांची कोविड चाचणी करण्याचे आदेशही सरकारने जारी केले. खबरदारीचा उपाय म्हणून ब्रिटनमधून विविध हवाई मार्गांनी ट्रान्झिट फ्लाईटस्‌मधून येणार्‍या विमान प्रवाशांचीही कोविड चाचणी केली जाईल असेही सरकारने स्पष्ट केले आहे.

ब्रिटनमध्ये गेल्या काही दिवसांत कोरोना विषाणूचे नवे रूप आढळून आले असून त्यामुळे अनेक देशांनी यापूर्वीच ब्रिटनहून येणार्‍या विमानांवर बंदी घातली आहे. भारत ही बंदी लागू करणारा दहावा देश ठरला आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी दक्षिण इंग्लंडमध्ये कोरोनाच्या या नव्या विषाणूचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाल्याची कबुली नुकतीच दिली होती. सध्याच्या विषाणूपेक्षा नवा विषाणू सत्तर टक्के अधिक संसर्गजन्य असल्याचेही आढळून आले आहे. ब्रिटनच्या पंतप्रधानांनी घोषणा करताच लगोलग शनिवारी फ्रान्स, जर्मनी, इटली, नेदरलँड, बेल्जियम, ऑस्ट्रिया, कॅनडा, आयर्लंड आणि बल्गेरिया या देशांनी ब्रिटनच्या हवाई सेवेवर निर्बंध लागू केले होते. दरम्यान, भारत सरकार या नव्या कोरोना विषाणूसंदर्भात सतर्क असून घाबरून जाण्याचे कारण नाही असे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी म्हटले आहे.

कोरोना विषाणूच्या नव्या रूपामुळे ब्रिटनमध्ये कडक लॉकडाऊन जारी करण्यात आले असून जनतेला येत्या ३१ डिसेंबरपर्यंत घराबाहेर न पडण्यास सांगण्यात आले आहे. सध्या ब्रिटनमध्ये ख्रिसमसचे वातावरण असले तरीही यंदा या सणावर बंधने घालण्याची घोषणा तेथील सरकारने केली आहे. ब्रिटनमध्ये लॉकडाऊन जारी करावे लागण्याची ही चौथी वेळ आहे. लंडनमध्ये येत्या ख्रिसमसला कौटुंबिक एकत्रीकरण करण्यास पूर्ण मनाई करण्यात आली असून गावांमध्ये मात्र ख्रिसमसच्या दिवशी थोडीशी सूट दिली जाणार आहे.

ब्रिटनमध्ये कोरोनावरील लशीकरणाला सुरूवात झाली असली तरी ही लस नव्या प्रकारच्या विषाणूवर मात करू शकते की नाही हे स्पष्ट नाही. ज्याला कोविड १९ म्हटले जाते तो सार्स – कोव्ह २ विषाणू गेल्या काही महिन्यांत जगभरात आढळून आला असला तरी व्हीयूआय २०२०१२-०१ हे त्याचे आणखी एक रूप ब्रिटनमध्ये आढळून आले आहे. सध्याच्या विषाणूपेक्षा तो सत्तर टक्के अधिक संसर्गजन्य असल्याचे ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी पत्रकार परिषदेत घोषित केले आहे.

ब्रिटनमधील आरोग्य व समाजकल्याण खात्याच्या नवीन व उदयोन्मुख श्वसनविषयक विषाणू धोके सल्लागार समिती (नर्वटॅग) या तज्ज्ञ समितीने आपल्या अहवालात तशी शक्यता वर्तवलेली आहे. जागतिक आरोग्य संघटनेला आम्ही या नव्या विषाणूबाबत अवगत केलेले असून उपलब्ध माहितीचे विश्लेषण करून त्या विषाणूबाबत अधिक जाणून घेण्यात येत आहे असेही या समितीतर्फे सांगण्यात आले.

या नव्या विषाणूमुळे मृत्यूचे प्रमाण काय आहे हे अद्याप कळू शकलेले नाही. सुरवातीला हा विषाणू ब्रिटनच्या काही भागांत १० ते १५ टक्क्यांच्या आसपास आढळून आला होता, मात्र काही दिवसांतच त्याचे प्रमाण साठ टक्क्यांवर जाऊन पोहोचल्याचे आढळून आले आहे अशी माहिती लंडनच्या किंग्ज कॉलेजमधील विषाणूशास्त्राचे प्राध्यापक स्टुअर्ट नील यांनी दिली.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांत
रात्रीची संचारबंदी लागू

महाराष्ट्र सरकारने येत्या पाच जानेवारीपर्यंत राज्यातील प्रमुख शहरांमध्ये रात्री ११ ते पहाटे ६ या वेळेत रात्रीची संचारबंदी जारी केली आहे. ख्रिसमस आणि नववर्ष सोहळ्यांमुळे कोरोना विषाणूचा पुन्हा उद्रेक होण्याची शक्यता असल्याने ही संचारबंदी जारी करण्यात आली आहे. ब्रिटन आणि युरोपमधून तसेच मध्यपूर्वेच्या देशांतून येणार्‍या सर्व विमान प्रवाशांना ते मुंबईत उतरल्यापासून चौदा दिवस होम क्वारंटाइन करण्याचा निर्णयही महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. पुढील पंधरा दिवस अधिक सतर्क राहावे लागेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यानी म्हटले आहे.