- शंभू भाऊ बांदेकर
२०१८ चा हा विश्वकरंडक महासंग्राम सुमारे साडेतीनशे कोटी लोकांनी पाहिला व त्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. असंख्यांचे जगज्जेतेपदासाठी कोणत्या दोन संघांमध्ये सामना होणार याचे अंदाज चुकले. असंख्यांना बाद फेरीपासूनच उपांत्य फेरीपर्यंतच्या सामन्यांमध्ये अनेक देशांच्या अनेक संघांनी कधी गोड तर कधी कडू अनुभव चाखायला लावले…
तब्बल महिनाभर चाललेला ‘फिफा २०१८’चा फुटबॉल विश्वचषक महासंग्राम नुकताच संपुष्टात आला. जगातील २११ देशांतील जवळपास २७ कोटी लोक प्रत्यक्ष फुटबॉल खेळतात. एका अंदाजानुसार २०१८ चा हा विश्वकरंडक महासंग्राम सुमारे साडेतीनशे कोटी लोकांनी पाहिला व त्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. असंख्यांचे जगज्जेतेपदासाठी कोणत्या दोन संघांमध्ये सामना होणार याचे अंदाज चुकले. असंख्यांना बाद फेरीपासूनच उपांत्य फेरीपर्यंतच्या सामन्यांमध्ये अनेक देशांच्या अनेक संघांनी कधी गोड तर कधी कडू अनुभव चाखायला लावले. असंख्य लोकांसाठी सुखद, दु:खद धक्के देत हा विश्वचषक फुटबॉल महासंग्राम संस्मरणीय ठरला.
रशियातील मॉस्को येथे मैदानात बिगुल वाजून तब्बल ३२ दिवस चाललेल्या या फुटबॉलच्या महासंग्रामात अक्षरश: फुटबॉलचे अवघे जग ढवळून निघाले. जगातील ५ खंडांचा हा खेळ – त्यात युरोप, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका नेहमी आघाडीवर. आशिया, आफ्रिका हे खंड थोडेसे पिछाडीवर असले तरी या खंडातील अनेक देशांनी सामन्यांमध्ये थरारनाट्य निर्माण केले. यात आशिया खंडातील दक्षिण कोरिया व जपान या देशांचा समावेश करावा लागेल, तर आफ्रिका खंडातील नायजेरिया, सेनेगल व मोरक्को या देशांचा समावेश करावा लागेल.
संपूर्ण जगभरात लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या या फुटबॉल खेळामध्ये जे गूढ दडलेले आहे त्याबाबत अमेरिकेचे ज्येष्ठ पत्रकार केन बेनसिंगर यांनी आपल्या ‘रेड कार्ड’या पुस्तकात नमूद केले आहे ते असे, फिफा वर्ल्डकप ही क्रीडा जगतातील सर्वांत लोकप्रिय आणि सर्वाधिक आर्थिक उलाढाल करणारी स्पर्धा आहे. असे असले तरी या स्पर्धेचे आयोजकपद भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी विश्वातील घडामोडींद्वारे निश्चित केले जाते, ही धक्कादायक बाब होय. क्रिकेट विश्वातील मॅच फिक्सिंगचे धक्के पचविल्यानंतर या संपूर्ण जगाला विळखा घालणार्या फुटबॉलचा धक्काही आपल्याला पचवता आला पाहिजे.
या फुटबॉलच्या थरारनाट्यात युरोपमधील जर्मनी, इंग्लड या देशांना व दक्षिण अमेरिकेतील ब्राझिल, अर्जेंटिना या देशांना यावेळी शापित विजेते म्हणून उल्लेख करण्यात आला आहे, त्याचे कारण म्हणजे ब्राझिलमध्ये चार वर्षापूर्वी चौथ्यांदा फुटबॉल विश्वकरंडक जिंकलेल्या जर्मनीला यंदा रशियात नामुष्कीला सामोरे जावे लागले होते. जर्मनीसारख्या बलाढ्य संघाचे आव्हान पहिल्याच फेरीत आटोपले. विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत अठरा वर्षांत चार वेळा जगज्जेते पहिल्या फेरीतच गारद होण्याचा एक आगळावेगळा विक्रम नोंदवला गेला आहे. स्पर्धेच्या इतिहासात तशी एकंदरीत ही सहावी वेळ आहे.
फ्रान्सने १९९८ मध्ये विश्वकरंडक जिंकला होता. मात्र, २००२ मध्ये ते पहिल्याच फेरीनंतर माघारी परतले होते. आता मात्र ते जगज्जेत्याच्या शर्यतीत पाय रोवून बसले व त्यांनी जगज्जेतेपदाला गवसणी घातली. नावाजलेल्या इटलीने २००६ मध्ये चौथ्यांदा जगज्जेतेपद मिळविले असले तरी २०१० मध्ये ते पहिल्या फेरीचा अडथळा सुद्धा पार करू शकले नव्हते. २०१० मध्ये स्पेनने विश्वकरंडकावर आपले नाव कोरले खरे; परंतु २०१४ मध्ये त्यांची कामगिरी अत्यंत लाजिरवाणी ठरली. पहिल्या फेरीत बाद झालेल्या स्पेनवर जगभरातून टीका झाली. अठरा वर्षांत ब्राझिलची कामगिरी मात्र अपवादात्मक ठरली. २००२ मध्ये पाचव्यांदा जगज्जेतेपद मिळविल्यानंतर २००६ त्यांनी उपांत्यपूर्व फेरीपर्यंत प्रगती साधली होती. यावेळी मात्र ब्राझिलसारख्या लोकप्रिय व तगड्या संघावर सात गोलांचा वर्षाव करून २०१४ मध्ये ज्या जर्मनीने जगज्जेतेपदावर दावा केला त्याच संघाला दक्षिण कोरिया सारख्या एका आशियाई संघाने स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवण्याची किमया साधली.
अनेकवेळा विश्वविजेत्या संघाला प्राथमिक साखळी फेरीतच बाद होण्याचा क्रम चालू राहण्याने जगज्जेत्या संघांसाठी त्यांनी मिळविलेले विश्वविजेतेपद हा जणू शाप ठरत आहे की काय, अशी प्रतिक्रिया क्रीडा क्षेत्रातील ज्येष्ठ पत्रकारांकडून ऐकू – वाचू येत आहे. जर्मनीवर टीका करताना म्हटले गेले आहे की, ८० वर्षार्ंनंतर साखळी फेरीतून प्रथमच बाद होण्याची नामुष्की पदरी पडल्याने जर्मनीसाठी पुढील अनेक वर्षे या अपयशाची टोचणी कायम राहणार आहे.
जर्मनीच्या या खेळामुळे ते यावेळी जगज्जेतेपदाचे मानकरी ठरतील, असा विश्वास बळगणार्यांना जबरदस्त धक्का बसला असणार यात शंका नाही. हीच गोष्ट ब्र्राझिल व इटलीबाबतही म्हणता येईल.
विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीतील टप्प्याची सुरुवात झाली आणि अखेरच्या सोळा संघांमध्ये आफ्रिका खंडातील पाचपैकी एकही देश स्थान मिळवू शकत नाही, तर आशिया खंडाने मात्र अक्षरश: कमाल आणि धमाल करून सोडली. फुटबॉलच्या मैदानावरही आता आम्हाला कृपया कमी लेखू नका, असा इशाराच दिलेला आहे. दक्षिण कोरियाने बलाढ्य अशा जगज्जेत्या जर्मनीला हरवणे हे तर त्या देशातील जणू जगज्जेतेपद मिळवण्यासारखे आहे. जपानने अंतिम सोळा संघांमध्ये स्थान मिळवून आशियाई फुटबॉलला प्रेरणा व नवी झळाळी देण्याचे काम केले आहे. अर्थात आशियाई देशांकडून विश्वचषक जिंकण्याची आशा कुणी धरत नसले, तरी जपान आणि दक्षिण कोरिया यांची रशियातील कामगिरी भारतासारख्या फुटबॉलप्रेमी लोकांसाठी व खेळांडूसाठी प्रेरणादायी आहे, हे मात्र, निश्चित. यावरून पुढे ‘हम भी कुछ कम नही’ चा संदेशच जणू या दोन्ही देशांनी दिला आहे.
बेल्जियम, उरुग्वे, स्वीडन या देेशांनाही आपल्या चाहत्यांना दिलासा देण्याचे काम केले आहे. बेल्जियमची कामगिरी भविष्यकाळात त्या देशाला यशोशिखराकडे घेऊन जाईल, असे फुटबॉल रसिकांना वाटत आहे. क्रोएशियाचे तर कौतुक करावे तेवढे थोडेच म्हणावे लागेल. जगज्जेत्या संघांशी दोन हात करत त्यांनी फ्रान्सबरोबर अंतिम सामन्यात पदार्पण केले. क्रोएशियाचीही कामगिरी अवर्णनीय अशी आहे. ते उपविजेते ठरले तरी त्यांच्या खेळाचे फार कौतुक झाले.
अत्यंत चुरशीची ठरलेली ही स्पर्धा रशियाने यशस्वीपणे आयोजित करून जगापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. ‘फिफा’ फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष जियानी इन्फोटेनो यांनी म्हटले आहे की, रशियाच्या बाबतीत लोकांमध्ये जी प्रतिमा होती ती येथे आलेल्या दहा लाखांहून अधिक फुटबॉलप्रेमींच्या सकारात्मक अनुभवाने बदलली आहे. तसेच या स्पर्धेमुळे रशियाची प्रतिमा खूप उंचावली आहे हे अगदी शंभर टक्के खरे आहे.