वाजपेयींनी काश्मीरविषयी केलेल्या कामगिरीमुळे संपूर्ण जगाचा दृष्टिकोन बदलून जगात दहशतवादावर चर्चा सुरू झाल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये आयोजित सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेत बोलताना केले. अणुचाचणीपासून काश्मीरसारख्या समस्या सोडवण्यासाठी केलेल्या भरीव कामगिरीमुळे भारताची जगात एक शक्तिशाली राष्ट्र म्हणून ओळख निर्माण झाली अशा शब्दांनी मोदी यांनी यावेळी वाजपेयींचा गौरव केला.
काश्मीर समस्या सोडवण्याबाबतच्या वाजपेयी यांच्या योगदानाबाबत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, सुरुवातीच्या काळात भारताला आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर जम्मू-काश्मीरप्रश्नी उत्तरे द्यावी लागत असत. जेव्हा वाजपेयी यांना या प्रश्नावर काम करण्याची संधी मिळाली तेव्हा त्यांनी कुशलतेने हा प्रश्न हाताळला. त्यानंतर जगभरात दहशतवादावर चर्चा होऊ लागली. दहशतवादाच्या विरोधात कोण आहे आणि दहशतवादाला कुणाचा पाठिंबा आहे, यावर जगभरात बोलले जाऊ लागले. दहशतवादाच्या मुद्यावर संपूर्ण जगाला सोबत घेण्यासाठी ते यशस्वीपणे पुढे गेल्याचे मोदी म्हणाले.