जगातील सर्वाधिक 10 प्रदूषित शहरांत भारतातील तीन शहरे

0
18

जगातील सर्वाधिक 10 प्रदूषित शहरांमध्ये तीन भारतीय शहरांचा समावेश आहे. यामध्ये दिल्ली, कोलकाता आणि मुंबई या शहरांचा समावेश आहे. दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक काल रविवारी सकाळी 11:45 वाजता 701 नोंदवला गेला.
दिल्लीतील हवा गेल्या चार दिवसांपासून विषारी आहे. दिल्ली सरकारने प्राथमिक शाळा 10 नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दिल्लीचे शिक्षणमंत्री अतिशी यांनी याबाबत माहिती देताना, इयत्ता 6-12वीच्या विद्यार्थ्यांसाठीही ऑनलाइन वर्गांचा विचार केला जात असल्याचे सांगितले. यापूर्वी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 3 आणि 4 नोव्हेंबर रोजी शाळा बंद ठेवण्याचे निर्देश दिले होते.

दरम्यान डॉक्टरनी दिलेल्या माहितीनुसार गरोदर महिला आणि लहान मुलांना प्रदूषणाचा सर्वाधिक धोका असतो. खराब हवेच्या गुणवत्तेमुळे गर्भवती महिलांच्या गर्भाशयात वाढणाऱ्या बाळालाही हानी पोहोचते. प्रदूषणामुळे त्वचा आणि हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका आहे. याशिवाय मधुमेह, अल्झायमर आणि सतत डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.
दिल्लीतील ही हवा 25-30 सिगारेटच्या धुराच्या समतूल्य असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे असून त्यामुळे सर्व वयोगटातील लोकांवर त्याचा गंभीर परिणाम होत असल्याचे सांगितले. येत्या काही दिवसांत दिल्लीची हवा आणखी खराब होणार असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

दिल्लीचे पर्यावरणमंत्री गोपाल राय यांनी शनिवारी केंद्राला लिहिलेल्या पत्रात केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांना पाच राज्यांच्या (दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थान आणि हरियाणा) पर्यावरणमंत्र्यांसोबत तातडीची बैठक घेण्यास सांगितले आहे.
दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाबाबत शास्त्रज्ञांनीही चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते आगामी काळात दिल्लीची हवा आणखी खराब होऊ शकते. तसेच शास्त्रज्ञांनी कमी पाऊस हे प्रदूषण वाढण्याचे प्रमुख कारण असल्याचे सांगितले. यंदा ऑक्टोबरमध्ये केवळ एकाच दिवशी 5.4 मिमी पाऊस झाला. तर ऑक्टोबर 2022 मध्ये 6 दिवस 129 मिमी तर ऑक्टोबर 2021 मध्ये 7 दिवस 123 मिमी पाऊस पडला होता.