जगभरातील बँक, आयटी, विमानसेवा ठप्प

0
8

>> मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचा परिणाम; भारतासह अनेक देशांतील 1400 विमान उड्डाणे रद्द

मायक्रोसॉफ्ट सेवा ठप्प झाल्याने काल जगभरात मोठे संकट ओढवले. मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने जगभरात बँकांपासून ते विमान वाहतुकीपर्यंतच्या सर्व सेवा काल ठप्प झाल्या. आयटी सेक्टरमधील मायक्रोसॉफ्ट विंडोज्‌‍ 10 ही सर्वात मोठी यंत्रणा आहे; परंतु काल पहाटे 5 वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत मायक्रोसॉफ्टमधील तांत्रिक बिघाड कायम राहिल्यामुळे जगभरात विमानसेवा, रेल्वेसेवा, बँकसेवा, आयटीसेवा, शेअर मार्केट आणि अन्य क्षेत्रांवर विपरित परिणाम झाला. भारतात सुद्धा काल विमानसेवा पूर्णपणे विस्कळीत झाली. दिल्ली, मुंबईसह देशातील सर्व विमानतळांवर प्रवाशांचा गोंधळ उडाला. अमेरिका, ब्रिटन आणि भारतासारख्या अनेक देशांतील 1400 विमान उड्डाणे रद्द करण्यात आली, तर 3 हजार विमाने उशिराने उडाली.

मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड झाल्याने जगभरातील वापरकर्त्यांना काल अडचणींचा सामना करावा लागला. जगभरातील अनेक वापरकर्त्यांच्या विंडोज्‌‍ सिस्टिमवर निळ्या रंगाची स्क्रीन दिसत आहे. या स्क्रीनवर, तुमचा संगणक अडचणीत आहे आणि रिस्टार्ट करणे आवश्यक आहे, असा संदेश आहे. याला ब्लू स्क्रीन ऑफ डेथ (बीएसओडी) त्रुटी म्हटले जात आहे. अशा परिस्थितीत संगणकावर कोणतेही काम करता येत नाही. ब्लू स्क्रीन ऑफ डेथ ही एक गंभीर त्रुटी स्क्रीन आहे, जी विंडोज ऑपरेटिंग सिस्टमवर दिसते. जेव्हा काही गंभीर समस्येमुळे सिस्टम क्रॅश होते तेव्हा असे होते. या संदेशाचा अर्थ असा आहे की प्रणाली सुरक्षितपणे कार्य करू शकत नाही. या त्रुटीनंतर संगणक आपोआप रिस्टार्ट होऊ लागतो आणि डेटा गमावण्याची शक्यता वाढते.

या समस्येमुळे लाखो युजर्सवर मोठा परिणाम झाला आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी साधारण 12.30 दरम्यान मायक्रोसॉफ्टचा सर्व्हर ठप्प झाला. बऱ्याच वापरकर्त्यांनी अशी तक्रार केली की, त्यांची सिस्टम एकतर बंद झाली आहे किंवा त्यांना ब्लू स्क्रीन समस्येचा सामना करावा लागत आहे. मोठ्या बँका, आंतरराष्ट्रीय विमान कंपन्या, जी-मेल, ॲमेझॉन आणि इतर आपत्कालीन सेवांवरही त्याचा परिणाम झाला.

मायक्रोसॉफ्ट विंडोजमधील या समस्येचा प्रभाव कंपनीच्या अनेक सेवांवर पडला आहे. युजर्सना मायक्रोसॉफ्ट 360, मायक्रोसॉफ्ट विंडोज, मायक्रोसॉफ्ट टीम्स, मायक्रोसॉफ्ट अझूर, मायक्रोसॉफ्ट स्टोअर आणि मायक्रोसॉफ्ट क्लाउड-पावर्ड सर्व्हिसमध्ये समस्यांचा सामना करावा लागत आहे.
मायक्रोसॉफ्टने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात निर्माण झालेली ही समस्या अझुर बॅकएंड वर्कलोड्सच्या कॉन्फिगरेशनमध्ये बदल केल्यामुळे निर्माण झाली. त्यामुळे स्टोरेज आणि कॉम्प्युटर रिसोर्सेसमध्ये अडथळे निर्माण झाले.

क्राउडस्ट्राइक अपडेटमुळे मायक्रोसॉफ्टच्या अझुर क्लाउड आणि मायक्रोसॉफ्ट 365 सेवांमध्ये समस्या निर्माण झाल्या. क्राइडस्ट्राइक हे सायबर सुरक्षा प्लॅटफॉर्म आहे जे वापरकर्त्यांना सुरक्षा उपाय प्रदान करते. क्राउडस्ट्राइकने या प्रकरणाची दखल घेत समस्येचे निराकरण करण्यास सुरुवात केली आहे.

मायक्रोसॉफ्ट अझुर हे क्लाउड कॉम्प्युटिंग प्लॅटफॉर्म आहे. हे अनुप्रयोग आणि सेवा तयार करणे, तैनात करणे आणि व्यवस्थापित करण्यासाठी कार्य करते. मायक्रोसॉफ्ट 365 हे उत्पादकता सॉफ्टवेअर आहे, ज्यामध्ये वर्ड, एक्सेल, पॉवरपॉइंट, आउटलुक आणि वन नोट यासारख्या लोकप्रिय अनुप्रयोगांचा समावेश आहे.

भारतातील विमानसेवा कोलमडली
भारतात एअर इंडिया, इंडिगो, स्पाईसजेट, आकासा एअर, विस्तारा या 5 एअरलाइन्सने या तांत्रिक समस्येमुळे त्यांचे बुकिंग, चेक-इन आणि फ्लाइट अपडेट सेवा प्रभावित झाल्याचे काल जाहीर केले. विमानतळावर सेवा मिळत नसल्याने प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

क्राऊडस्ट्राईककडून निवेदन जारी
क्राऊडस्ट्राईकने यासंदर्भात निवेदन जारी केलेआहे. आम्ही या तक्रारींची माहिती घेत असून जोपर्यंत पुढील सूचना येत नाही, तोपर्यंत वापरकर्त्यांनी वाट पाहावी. याबरोबरच विंडोजवर चालणाऱ्या संगणकांमध्ये बीएसओडीची समस्या निर्माण झाली असून, वापरकर्त्यांनी स्वत:हून या समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न करू नये, अशी सूचना क्राऊडस्ट्राईकने केली आहे.

मायक्रोसॉफ्टने काय म्हटले आहे?
आम्हाला या समस्येची जाणीव आहे आणि आम्ही याचे निराकरण करण्यासाठी अनेक टीमना सामील केले आहे. आम्ही या समस्येचा तपास करत आहोत. ही समस्या सोडविण्यासाठी आम्ही पर्यायी यंत्रणा उभारण्याचा प्रयत्न करत आहोत. पर्यायी यंत्रणा उभारताना त्याचे सकारात्मक परिणाम दिसत असून, वापरकर्त्यांच्या अडचणी हळूहळू कमी होतील, असे मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे.