ओडिशातील पुरी येथील 12व्या शतकातील जगन्नाथ मंदिराचा खजिना अर्थात ‘रत्नभांडार’ 46 वर्षांनंतर रविवारी दुपारी पुन्हा एकदा उघडण्यात आला. मौल्यवान वस्तूंच्या यादीसाठी आणि त्याच्या संरचनेच्या दुरुस्तीसाठी हा खजिना उघडण्यात आला आहे. यापूर्वी हा खजिना 1978 मध्ये उघडण्यात आला होता. प्रथम रत्नभांडारची बाहेरची खोली उघडली आणि तिथे ठेवलेले सर्व दागिने आणि मौल्यवान वस्तू मंदिराच्या आतील तात्पुरत्या खोलीत हलवल्या आणि ही खोली सील केली. तूर्तास खोली सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत असेल. मौल्यवान वस्तूंची यादी आणि भांडार दुरुस्तीसाठी वेळ लागणार आहे.