
>> दक्षिण कोरियाचा ऐतिहासिक विजय
यंदाच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत धक्कादायक निकालांची मालिका चालूच आहे. काल इंज्युरी वेळेत नोंदविलेल्या दोन गोलांच्या जोरावर दक्षिण कोरियाने ‘फ’ गटात विद्यमान जगज्जेत्या जर्मनीला पराभवाचा धक्का दिला. त्यामुळे जर्मनीला गटफेरीतच बाहेरचा रस्ता धरावा लागला. विजयामुळे दक्षिण कोरियाचे ३ गुण झाले असून त्यांनी फ गटात तिसरे स्थान मिळविले. तर जर्मन संघ ३ गुणांसह तळाला फेकला गेला.
दक्षिण कोरियासाठी हा विजय म्हणजे ऐतिहासिक ठरला. विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या इतिहासात जर्मनीला पराभूत करणारा तो पहिला आशियाई संघ ठरला आहे. कालच्या सामन्यात जर्मन संघाने खेळावर पूर्णपणे वर्चस्व राखले होते. परंतु प्रतिस्पर्धी दक्षिण कोरियन बचावपटू व गोलरक्षकाने त्यांचे सर्व हल्ले परतवून लावले. त्यातच जर्मनीला सदोष लक्ष्याचाही फटका बसला. पूर्वार्धात कोरियाने जर्मनीला गोलशून्य बरोबरीत रोखले. उत्तरार्धात जर्मनीने पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढवला. पण सामन्याच्या ९० मिनिटांच्या नियमित वेळेत जर्मनीला गोल करता आला नाही.
इंज्युरी वेळेच्या दुसर्याच मिनिटाला (९०+२) कीम यंग-ग्वानने मिळालेल्या संधीचे सोने करताना जर्मन संघाच्या गोलपोस्टची जाळी भेदत दक्षिण कोरियाचे खाते खोलले. जर्मन संघाने हा गोल नोंदविताना कीम यंग-ग्वान ऑफसाईड असल्याचे अपील केले. परंतु व्हीएआरचा वापर केल्यानंतर रेफ्रीने त्यांचे अपील फेटाळताना हा गोल ग्राह्य असल्याचे जाहीर केले. एका गोलाच्या पिछाडीनंतर जर्मनीचा गोलरक्षकही आघाडी फळीत दाखल झाला. त्याचा फायदा उठवित ९०+६व्या मिनिटाला जु याने जर्मन गोलरक्षकाकडून चेंडू खेचून काढत जोरकस फटका जर्मन गोलपोस्टकडे मारला. मध्यरेषेवर असलेल्या ह्यूंग मीन धाव घेत चेंडूला जाळीचा दिशा दाखवित संघाला जर्मनीविरुद्ध पहिला विजय मिळवू दिला
कोरियाविरुद्धच्या पराभवामुळे जर्मनीचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. स्पर्धेच्या साखळी फेरीतच ८० वर्षानंतर प्रथमच जर्मनीला गाशा गुंडाळावा लागला. १९३८ साली जर्मनीला पहिल्या फेरीत स्पर्धेबाहेर व्हावे लागले होते. पण त्यावेळी स्पर्धा ही गटनिहाय खेळली जात नसे. गेल्या सलग चार विश्वचषकात विद्यमान जगज्जेत्या संघांना गटफेरीतच आपला गाशा गुंडाळावा लागला आहे हे विशेष. यापूर्वी २००२ साली फ्रान्स, २०१८साली इटली आणि २०१४ साली स्पेन या तत्कालीन विश्वविजेत्यांना गटफेरीतच बाहेरचा रस्ता धरावा लागला होता.